भावनिक निवृती

देशपांडे काका बहुतेक मझ्या जन्माच्या आधीपासून अपार्टमेंट मधे रहात असावेत.
दोन बीएचकेचा फ्लॅट होता. ज्यात देशपांडे काका काकू अणि त्यांचा मुलगा निखिल रहायचे.
शेजारीच त्यांनी, एक बीए चकेचा फ्लॅट घेऊन ठेवला होता. जो त्यांनी आत्ता रेंटवर दिलाय.
कुणाबरोबर बोलताना दुसर्‍या फ्लॅटचा विषय निघाला की काका म्हणायचे “म्हातारपणाची सोय”

काळ पुढे सरकत होता. निखिल सॉफ्टवेअर इंजीनियर झाला. त्याने त्याची लहानपणापासून असलेली मैत्रीण प्रणाली हिच्या बरोबर लग्न करायचे ठरवले.
लग्नाला सहा महिने असताना देशपांडे काकांनी त्या एक बीएचके मधे असलेल्या टेनंटला जागा सोडायला सांगितली.

“निखिल! तुझं लग्न झालं की तू आमच्या मास्टर बेडरूम मधे शिफ्ट हो. आम्ही तुझ्या रूम मध्ये जाऊ. नाहीतरी तुझ्या रूम मधे डबल बेड आहेच… अणि हों! आमच्या बेडरूम मधला बेड आता जुना झाला आहे. तो त्या रिकाम्या पडलेल्या वन बीएचके मधे टाकू
तुझ्यासाठी आपण नवीन बेड अणि वार्डरोब करून घेऊ”

निखिल प्रणालीच लग्न झालं.
दोघे हनिमूनला बालीला जावून आले.
लग्नाला साधारण महिना झाला असेल…
एका शनिवारी सकाळी देशपांडे काका, काकू, निखिल अणि प्रणाली ब्रेकफास्ट टेबल वर बोलत बसले होते…
काका म्हणाले, “आम्ही दोघं उद्यापासून शेजारच्या वन बीएचके मधे शिफ्ट होतोय”
“म्हणजे?” निखिलला काही कळलच नाही
“मी अणि तुझी आई, आपल्या बाजूच्या वन बीएचके मधे रहायला जातोय… फक्त जेवायला आम्ही इकडे येवू अणि आपण एकत्र असू… एरवी दिवसभर आमचा वावर तिकडेच असेल… आता हा टू बीएचकेचा फ्लॅट तुमचा… तुम्ही इथे संसार करायचा”
“असं का पण? आमचं काही चुकलं का?” प्रणालीने अगतिक झाल्यासारखे होऊन विचारलं
“अरे काही नाही! आम्ही काही तुमच्यावर रागावलो वगैरे तर बिलकुल नाही… पण तुम्हाला प्रायव्हसी मिळावी… तुमचा संसार तुम्हाला एंजॉय करता यावा म्हणून हा निर्णय आम्ही घेतला आहे”
“पण बाबा अशाने लोकं म्हणतील की मी सासू सासर्‍यांना वेगळं केलं” प्रणाली रडकुंडीला येऊन म्हणाली
“काही काळजी करू नकोस बाळा! आपण दोन्ही वेळा जेवायला एकत्रच आहोत… आपली स्वैपाकघरे थोडीच वेगळी आहेत… चूल एकच अणि रहायच्या जागा फक्त वेगळ्या… बरं! सोडून तोडून कुठे जातोय… आपल्याच फ्लॅट मधे शिफ्ट होतोय”
सगळेच जणं शांत होते
देशपांडे काकाच बोलायला लागले
“आम्ही तुम्हाला नवीन आयुष्य सुरु करण्याचं स्वातंत्र्य देत आहोत… तुमच्यावर लक्ष ठेवायला… तुमचं काही चुकलं तर सांगायला आम्ही शेजारीच आहोत की”
एक्स्ट्राची शेगडी, सिलिंडर, चहाच अणि इतर जरूरी समान अणि आपले कपडेलत्ते घेऊन देशपांडे काका काकू शिफ्ट झाले.

रविवारी सकाळी साडेसहा वाजता देशपांडे काकांनी, काकूंना चहा आणून दिला…
“लागली का नवीन जागेत झोप”
काकांच्या ह्या वाक्यावर दोघेही खळखळून हसले.
थोडा वेळ चहा घेण्यात शांततेत गेला…
“देशपांडे! आपण वेगळं रहायलांच पाहिजे होतं का?” काकूंनी विचारलं

देशपांडे काका बोलायला लागले…
“कसं आहे! मी अट्ठावन वर्षांचा अणि तुम्ही पंचावन्न… दोन वर्षात मी अणि पाच वर्षांनी तुम्ही नोकरीतून निवृत्त होणार… खरं म्हणजे आपल्याकडे ह्या वयात वानप्रस्थाश्रम सांगितला आहे… पण आत्ताच्या काळात प्रत्यक्ष असं कुठेतरी जावून राहणं शक्य नाही… म्हणुन गर्भितार्थ ओळखून आपण अलिप्त राहणं योग्य नाही का?… एकत्र राहिलो असतो तर रोज समोरासमोर बघून काहीतरी सल्ले द्यायचा मोह झाला असता… म्हणून आपण वेगळे आहोत… नोकरीच्या निवृत्ती बरोबर भावनिक निवृत्ती पण घ्यायला शिकू मॅडम!
भावनिक निवृत्ती म्हणजे भावनाहीन होणे नाही तर आता अनेक गोष्टीतून भावनिक गुंतवणूक सोडवली पाहिजे ना… आपल्या मनाचं कसं आहे ना! ते जास्त गुरफटत जातं… त्याला योग्य वेळी बाहेर काढलेलं बरं!

दुसरं…
आजकालच्या मुलामुलींची जगण्याची पद्धत अणि आपली पद्धत ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे… त्यांचं ते स्वच्छंदी अणि काहीसं बेफिकीर जिवन आपल्याला आवडलं नसतं… कदाचित पहावलं ही नसतं… मुलं सुद्धा मुक्तपणे… त्यांच्या इच्छेनुसार वागायला आपल्या समोर कुचंबली असती…
हे बघं! समजा त्यांना त्यांच्या मित्र मैत्रिणींना बोलावून घरी पार्टी करायची असेल… तर त्यांना प्रत्येकवेळी आपली संमती विचारावी लागणार… शिवाय येणारे तरुण लोक, घरात आपण आहे म्हंटल्यावर थोडे संकोचणार… थोडे दबून राहणार!… अहो त्यांच्या त्यांच्यातल्या जोक्सना देखील हे मोकळेपणाने मोठ्यांदा हसू शकणार नाहीत!… कशाला ऑकवर्ड करायचं त्यांना?… जनरेशन गॅप आपण आपल्या परीने सांभाळू… मुलं आपलं बघून शिकतील!…

अणि जरा राहू दे एकटं त्यांना… येणार्‍या डे टू डे संकटांचा, अडचणींचा सामना करू दे… त्यांच्या वाटा त्यांना शोधू दे की… प्रत्येकवेळी आपण का वाट दाखवायची त्यांना?
आणि मग असे वागलो तर त्यांना त्यांचा अनुभव कसा मिळणार?…

हे बघा! आपण आपल्या निखिल वर चांगले संस्कार केले आहेत… तसेच, प्रणाली वर पण झाले असतिल की? … एवढी काळजी करू नका… त्यांना मुक्तपणे झेप घेऊ द्या…
फारतर काय होईल?
चुकतील… धडपडतील
मग त्यावेळी आपण आहोत की सांभाळायला!
अठ्ठावीस तीस वर्षांचे आहेत… मॅच्युरिटी नक्की आहे… आणि कमी असेल तर येईल!… शेवटी लग्न केलंय त्यांनी… त्यांनाच सगळं हॅण्डल करता आलं पाहिजे ना!”

परत एक शांतता पसरली…
“मॅडम! आणखीन एक चहा घेणार का?”
देशपांडे काकांनी परत दुसरा चहा करून आणला…
“आणि मला सांगा सासुबाई… सूनबाईंना त्यांच्या माहेरची आठवण येणार… त्या रोज त्यांच्या आईला फोन करणार… आईला काही विचारणार… मग अशा वेळी तुमच्या ऐवजी त्यांचा सल्ला ऐकला… ज्यात काहीच गैर किंवा चुकीचं नाही… पण ते तुम्हाला चालेल का?… म्हणुन म्हटलं आपण भावनिक निवृत्ती घ्यायला हवी”

“तुम्ही ही पाश्चिमात्य लोकं कशी वागतात ते बघा… त्यांच्याप्रमाणे आपल्याला रुक्ष व्हायचं नाही… पण योग्य वेळी वेगळे होऊन ते सणाला, उत्सवांना, अडचणींना एकत्र असतात”

देशपांडे काकांच्या ह्या बोलण्याने काकूंचे बरेच गैरसमज दूर झाल्याचं त्यांच्या तोंडावरून दिसत होतं…
सगळं बोलणं झाल्यावर त्या उठल्या अणि घड्याळाकडे बघत म्हणाल्या… “अगं बाई साडेआठ झाले… सकाळी उठून तुम्ही बोलत बसलात… अणि मला आंघोळीला उशीर केलात”

काकांनी हसत हसत त्यादिवशीचा पेपर उघडला…
त्यांनी घेतलेल्या निर्णयाची त्यांना खात्री झाली होती…
साडेआठ हा आंघोळीला उशीर असेल…
तर निखिल अणि प्रणाली अजून झोपले होते बहुतेक!
ती शांतता जाणवत होती …
मग एकत्र असतो तर काय झालं असतं? ..
नुसत्या विचारांनीच काकांना परत एकदा हसायला आलं…
😅

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: