श्री पद्मनाभस्वामी मंदिर

*केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिराचे रहस्य…🕉️🚩*

त्या भयाण गर्भगृहात तो अलौकिक दरवाजा उघडण्यासाठी काही लोक सरसावले होते. त्यांचा तो यत्न निष्फळ जाणार होता…आणि कदाचित तोंडातून वाचा आणि शरीरातून प्राण सुद्धा…पण याची त्यांना कल्पना कुठे होती….

जगातलं…फक्त भारतातीलच नव्हे तर जगातलं…सर्वात श्रीमंत देवस्थान – मंदिर कोणतं ? तर ते आहे भारतात ! केरळ येथील तिरुवनंतपुरम मधील पद्मनाभ स्वामी मंदिर ! या मंदिराची संपत्ती सांगितली तर अवाक् होईल एखादी व्यक्ती ! पण जितकी संपत्ती मोठी….तितकंच मोठं आहे इथलं रहस्य ! मागील शंभर वर्षांपासून ते रहस्य उजागर करण्याचा अनेकदा अनेकांनी प्रयत्न केला पण सगळे प्रयत्न फोल ठरले. त्या रहस्याबाबत एक मोठी भिती मात्र आहे. की जर ते रहस्य उलगडलं तर काय होईल ? प्रलय येईल ? किती मोठा ? आणि त्याची दाहकता कुठवर असेल केवळ केरळ पुरती की संपूर्ण जगापर्यंत ? मग असं सगळं असेल तर ते रहस्य उलगडून बघण्याची खरंच गरज आहे का ?

मंदिराची पार्श्वभुमी..

आपल्या शेवटच्या काळात वृद्ध झालेले भगवान श्री कृष्ण औदुंबराच्या एका डेरेदार वृक्षाखाली पहुडलेले होते. रात्रीच्या वेळी त्या वृक्षमय भागात एक शिकारी आला. श्री कृष्णाच्या गळ्यात कौस्तुभ मणी होता. तो चमकदार होता. त्या चमकदार मण्याला पक्ष्याचा डोळा समजून शिकाऱ्याने त्या दिशेने वेध घेतला. तो बाण थेट श्री कृष्णाच्या पायात जाऊन रुतला. श्री कृष्णाने त्या ठिकाणी देहत्याग केला. शिकाऱ्याला हे कळताच त्याला अतीव दुःख झालं . तिथेच त्याने श्री कृष्णाचा अंतिम संस्कार केला. शरीर तर विलीन झालं , पण शाबूत राहिलं ते हृदय ! शिवाय कौस्तुभ मणी सुद्धा तसाच राहिला. शिकाऱ्याने ते हृदय लाकडाच्या एका ओंडक्यावर ठेवून समुद्रात वाहून दिलं. पुढे इंद्रद्युम्न नावाच्या एका राजाने ते हृदय समुद्र किनाऱ्यावरून उचलून एका मंदिरात त्याची स्थापना केली. आज आपल्याला माहिती आहे ते जगन्नाथ पुरी मंदिर हेच…

कौस्तुभ मणी मात्र त्या शिकाऱ्याने स्वतःकडे ठेऊन घेतला . पुढे त्याने त्याच्या राजाकडे तो सोपवला. नंतर सहाव्या शतकात तिरुवनंतपुरमच्या राजाने पद्मनाभ स्वामी मंदिराची स्थापना केली. आणि आपल्या आसपासच्या राज्यातील सर्व राजांना येथे दर्शनाचा तसेच त्यांच्या खजिन्यातील काही भाग मंदिराला दान म्हणून देण्याचा सांगावा धाडला ! त्या शिकाऱ्याने ज्या राजाला कौस्तुभ मणी सोपवला होता , त्या राजालाच्या वंशजांनाही हे आमंत्रण आलं. त्यांनी मंदिराला दिलेल्या दानात तिरुवनंतपुरमच्या राजाकडे कौस्तुभ मणी सुद्धा देऊन टाकला ! कौस्तुभ मणी खूप चमत्कारी मणी होता. त्याची कीर्ती ज्यावेळी तिरुवनंतपुरमच्या राजाला कळली तेव्हा तो चिंतेत पडला. त्याला ही काळजी लागली की हा मणी जर एखाद्या वाईट प्रवृत्तीच्या हाती पडला तर एखादा अनर्थ ओढवला जाऊ शकतो. त्यामुळे त्याने मंदिरात एका गर्भगृहात अनेक पुजाऱ्यांकडून यज्ञ करवून घेऊन शास्त्रशुद्ध पद्धतीने कौस्तुभ मणी ठेवला आणि ते गर्भगृह बंद करून घेतलं !

पण हेच सत्य आहे असं नाही. ही गोष्ट सुद्धा एक मान्यता आहे. काही जण मानतात की मंदिराची स्थापना सहाव्या शतकात झाली . काही मानतात की सतराव्या शतकात झाली. काही मानतात की पाच हजार वर्षांपूर्वी झाली. एक ठोस असा अनुमान नाही !

या मंदिरात भगवान विष्णूंची स्थापना केली गेलेली आहे. त्यांची प्रचंड मोठी अशी मूर्ती इथे आहे.

*पद्म = कमळ*

*नाभ = नाभी , बेंबी*

ज्याच्या नाभीवर कमलपुष्प आहे असा तो !

हा पद्मनाभ या शब्दाचा अर्थ होतो. हे मंदिर खूप प्रसिध्द आहे. भारतात तसच भारताबाहेरही . विदेशातून अनेक पर्यटक या मंदिराला भेट देतात. अनेक दक्षिणात्य चित्रपटांत हे मंदिर चित्रित झालंय. इथे प्रवेश मात्र फक्त हिंदू धर्मियांनाच आहे . महिला फक्त साडी नेसूनच इथे दर्शन घेऊ शकतात आणि पुरुष फक्त धोती नेसून.

*मंदिराचा इतिहास…*

पद्मनाभ स्वामी मंदिर हे त्रावणकोर संस्थानाच्या राजेशाही परिवाराच्या एका अर्थाने मालकितच आहे. सतराव्या शतकात याच परिवाराच्या एका नात्यातून आलेले मार्तंड वर्मा यांनी स्वतःची ओळख विष्णू – भक्त अशी सांगितली. आणि त्यांची सगळी संपत्ती मंदिराला दान केली. पुढे यांनी आणि येणाऱ्या काळात यांच्याच वंशजांनी या मंदिराचा कारभार बघितला. १९९१ पर्यंत सगळं काही सोईस्कर , सुरळीत चाललं होतं. पण ९१ साली इथल्या शेवटच्या राजाचं निधन झालं. त्याला मुलगा नव्हता म्हणून मग पुढे या गादीवर कोण बसणार , मंदिराची जबाबदारी कोणावर असणार ? असे प्रश्न उद्भवू लागले. मग केरळ सरकारने ही जबाबदारी जो राजा नुकताच मरण पावला होता त्याच्या नातलग भावाला ‘ उत्तराटम तिरूनल मार्तंड वर्मा ‘ याला देऊन टाकली !

पण हे शासक गादीवर बसताच त्यांना मंदिरातल्या खजिन्याची आठवण झाली आणि लोभाने त्यांनी त्या खजिन्यावर स्वतःचा हक्क सांगितला. आजवर हे झालं नव्हतं. स्वतः मार्तंड वर्मा यांनी त्यांची सगळी संपत्ती मंदिराला दान केली होती , मंदिराच्या संपत्तीवर स्वतः चा अधिकार नव्हता सांगितला. म्हणून यावेळी काहीशी खळबळ माजली. कारण ही गोष्ट ऐकताच मंदिराचे पुजारी , सेवक आणि भक्तगण यांच्या भावना दुखावल्या गेल्या. हे लोक सरळ कोर्टात पोचले आणि राजपरिवारावर एक केस फाईल केली. त्यांच्या म्हणण्यानुसार हा खजिना , ही सगळी संपत्ती , सगळं काही मंदिराचं होतं. कुणाच्याही खाजगी मालकीचं नव्हतं ! मग प्रत्युत्तरात नुकतेच नेमलेले राजपरिवाराचे मालकही कोर्टात पोचले.

कोर्टाने दोन्ही पक्षांच्या वार्ता ऐकून अंतिम निर्णय दिला. की मंदिराची संपत्ती ही मंदिराचीच आहे आणि तिच्यावर कुणीही आपला अधिकार वा हक्क सांगू शकत नाही. तसेच कुणी नातलग किंवा वारस राजगादीवर बसून मंदिराचा अधिकारी असावा याची काहीही गरज नाहीये. आणि हे सांगून नुकत्याच राजगादीवर बसलेल्या भावाकडून मंदिराचे सगळे अधिकार काढून घेतले गेले. आणि मंदिर हे एक ट्रस्ट सांभाळेल असा निर्णय दिला आणि ट्रस्टची स्थापना सुद्धा केली गेली.

पण हा खटला इथेच न थांबता पुढे सुप्रीम कोर्टापर्यंत गेला. पण तिथवर जाईस्तोवर २० वर्षांचा कालावधी निघून गेला…

२०११ साली सुप्रीम कोर्टाने यावर एक निर्णय सांगितला. त्या काळात मंदिराच्या संपत्ती आणि खजिन्याबद्दल पुजारी , ट्रस्टी , आणि सेवक चिंतित होते. इथे खजिना आहे – खजिना आहे , ही वार्ता सगळीकडे पसरली गेली होतीच. त्यामुळे मंदिराच्या संपत्तीवर कुणी नजर ठेवून आहे , संपत्तीला धोका आहे असं त्यांना वाटू लागलं. म्हणून सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की अधिकृतपणे यातील खजिना असलेले मुख्य ६ सहा दरवाजे आता उघडले जावे. आणि त्यातील संपत्ती मोजून , योग्य त्या नोंदी ठेवून त्यांना अजून सुरक्षेत ठेवावं . आणि सुप्रीम कोर्टानेच एक समिती बनवून काही ठराविक लोकांची टीम बनवली. हीच टीम सर्व दरवाजे उघडून आतली संपत्ती मोजणार होती…

रहस्य..

या मंदिराच्या आत सहा दरवाजे आहेत. आणि त्या सहाही दरवाज्यांच्या मागे आहे एखाद्या तळघरासारखी जागा … एखादी खोली असावी अशी. त्या सहा दरवाज्यांना इंग्रजी अक्षरांनुसार अनुक्रमे A B C D E F अशी नावे दिलेली आहे. हे सहाही दरवाजे अनेक वर्षांपासून उघडण्याचे प्रयत्न केले गेले होते. पहिला प्रयत्न १९०८ साली . दुसरा प्रयत्न १९३१ साली आणि तिसऱ्यांदा २०११ साली. पैकी २०११ साली तिसऱ्या प्रयत्नात दरवाजे उघडण्यात यश आलं. आणि समोर उभ्या ठाकलेल्या दृष्यामुळे सगळेजण चकित झाले….

खजिना , पैसा , सोनं , चांदी , नाणी , अलंकार , सोन्याचे भांडे , सोन्याचे हत्ती , सोन्याचे कुंभ , सोनंच सोनं , हिरे , माणके , मोती सुद्धा !! प्रचंड मोठा ऐवज हाती लागला होता. सुप्रीम कोर्टाच्या निगरानित जेव्हा या ऐवजाची गणती केली गेली त्यावेळी त्याची आजच्या काळातली किंमत होती १ लाख ६६ हजार ३० कोटी ७० लाख रुपये इतकी !!!

सगळं झालं होतं ! पण ….. एक दरवाजा मात्र उघडायचा राहून गेला होता….

खरंतर सगळे दरवाजे क्रमाक्रमानेच उघडले गेले होते. आणि पहिला दरवाजा उघडल्यानंतरच ते लोक या दुसऱ्या दरवाज्याकडे आले होते. पण हा दरवाजा बाकी दरवाज्यांसारखा नव्हता. इतर सर्वांना सामान्य द्वारे होती. मोठमोठ्या कड्या होत्या. ज्या सहजपणे उघडल्या गेल्या.हा एकमेव दरवाजा असा काहीसा होता..

दरवाज्यावर दोन सापांचं चित्र होतं. शिवाय मुख्य द्वराआधी एक लोखंडी जाळी होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे कुठलीही कडी किंवा हॅण्डल असं काहीच नव्हतं. त्यामुळे उघडावा कसा हादेखील एक यक्ष प्रश्न होता ?

एक आणखी गोष्ट त्या टीमने कोर्टाकडे नमूद केली . की , ज्यावेळी निवडक काही जण B दरवाज्यापाशी आले त्यावेळी वातावरण नेहमी असतं तसं न राहता काहीसं अगम्य , गढूळ होऊन गेलं. नकारात्मकता तिथे पसरली. ही गोष्ट विचित्र यामुळे होती की बाकी सगळे दरवाजेही अशाच बंदिस्त ठिकाणीच स्थित होते. पण तिथे जाऊन असं काहीही वेगळं यांना वाटलं नाही. इथे मात्र परिस्थिती निराळीच झाली.

टीमने ही गोष्ट कोर्टाकडे सांगितली. आणि कोर्टानेही ही बाब पुन्हा एकदा तपासून बघितली. यावर ठोस असा काही निर्णय दिला नाही . पण तूर्तास हा दरवाजा खोलू नये असा आदेश दिला.

काय आहे हे तर अजून समोर आलं नाहीये पण मिथके भरपूर आहेत.

१९०८ साली सर्वात पहिल्यांदा हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला गेला होता. काही व्यक्तींचा समूह यासाठी पुढे सरसावला. त्यांनी अथक प्रयत्नांनी या दरवाज्याच्या समोरची लोखंडी जाळी खोलली होती. मुख्य दरवाजा खोलायचा बाकीच होता. की त्याचवेळी अनेक साप तिथे आले. वेगवेगळ्या फटिंतून ‘ किंग कोब्रा ‘ जातीचे ४ ते ५ मोठ्या आकाराचे साप तिथे आले. आणि या लोकांवर हल्ला करू लागले. काहींना ते चावले सुद्धा . तिथलं वातावरण पूर्णपणे बिघडून गेलं आणि या सर्व लोकांनी शेवटी तिथून पळ काढला. ही गोष्ट जास्त चर्चेत यामुळे आली की , जे जे लोक त्या दिवशी हा दरवाजा उघडण्यासाठी आत गेले होते त्यांचा पुढे काही ना काही कारणांनी मृत्यू झाला. पैकी ज्यांना साप चावला होता त्यांच्या मृत्यूचं कारण वेगळं सांगणं नकोच . पण साप काही सर्वांना चावला नव्हता आणि ८-१० लोकं तिथे गेले आणि एकदोन जनांनाच सर्पदंश झाला होता मग त्या बाकी सर्वांचा मृत्यू का झाला असावा ? एकजात फक्त को – इन्सीडेंटच असेल ? शिवाय याच आसपास तिरुवनंतपुरम मध्ये दुष्काळ सुद्धा पडला होता. तिथून ही मान्यता पडली की हा दरवाजा उघडण्याचा फक्त प्रयत्नच केला तर अशी अवघड परिस्तिथी उद्दभवली मग जर हा दरवाजा पूर्णपणे उघडला गेला तर किती मोठा प्रलय येईल…

काहीजण हेसुद्धा म्हणतात की तिथे साप असण्याचा प्रश्नच येत नाही कारण तिथे ना पाणी आहे , ना हवा आहे , ना दरवाजा उघडण्यासाठी काही विशिष्ट जागा अशी आहे मग आत साप जिवंत कसे राहू शकतात ?

जितके वेळेस तिथे हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा प्रत्येक वेळी मात्र एक गोष्ट प्रकर्षाने सर्वांना जाणवली की शांतपणे जर ऐकलं तर दरवाज्याच्या आतून पाण्याचा संथ आवाज येतो. हे मंदिर मात्र समुद्रापासून जवळ आहे आणि हा आवाज तिसरीकडून कुठून न येता समुद्रातूनच येतो आहे , असं अनेकांचं म्हणणं आहे. हे एक मोठं तथ्य आहे असं बऱ्याच अंशी सिद्ध होतं. आणि दरवाजा उघडल्यावर प्रलय येईल वगेरे ते हेच की जर दरवाजा उघडला तर समुद्राचं सगळं पाणी मंदिरात येईल आणि परिणामी सगळं मंदिर आणि पाण्याचा प्रभाव जर जास्त असेल तर सगळं शहरही पाण्याखाली जाईल.

हा मुद्दा बऱ्याच अंशी पटण्यासारखा आहे

काहीजण असं मानतात की इतिहासातून या मंदिराशी संबंधित अनेक व्यक्तींच्या समाधी इथे आहेत. आणि त्या समाधी कुठल्याही कारणाने भंग होऊ नये म्हणून हा दरवाजा असा पॅक करून ठेवलेला आहे.

काहीजण म्हणतात की मंदिराची संरचना अशी आहे की संपूर्ण मंदिर याच ठिकाणच्या गाभ्यावर उभारलेलं असू शकतं , आणि हा दरवाजा जर उघडला गेला तर संपूर्ण मंदिर ढासळून जाऊ शकतं. कारण इतर दरवाज्यांपेक्षा हा दरवाजा अधिक मजबुतीने बांधलेला दिसतो. म्हणून हा दरवाजा कुणीही उघडू नये यामुळे सावधानतेचा इशारा म्हणून किंवा एक भीती म्हणून इथे सापांचं चित्र आहे. की या भागाची रक्षा साप करतात वगेरे…

ज्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली हे सगळे दरवाजे उघडण्याची मोहीम आखली गेली आणि एक टीम बनवली ते म्हणजे टी . पी . सुंदरराजन ! त्यांनी जेव्हा ही मोहीम हाती घेतली आणि दरवाजे उघडण्याची सुरुवात केली त्यावेळी ते वॉल्ट B विषयी ऐकून होते म्हणून त्यांनी आधी बाकीचे सर्व दरवाजे उघडले आणि नंतर शेवटी हा दरवाजा उघडण्याचं ठरवलं . पण …. तो उघडण्याआधीच सुंदरराजन यांचा मृत्यू झाला ! भक्त आणि भाविकांत अशी ठाम मान्यता आहे की या दरवाज्याला एक शाप जडलेला आहे की जो कुणी हा दरवाजा उघण्याचा प्रयत्न करेल तो या शापाने होरपळून मरेल ; याच शापामुळे सुंदरराजन यांचा अकाली मृत्यू ओढवला आहे. हा दरवाजा उघडावा अशी भगवंतांची ईच्छा नाही !

काहीजण मानतात की जेवढा खजिना आतापर्यंत बाकीचे पाच दरवाजे उघडून मिळाला आहे त्यापेक्षा दुप्पट – तिप्पट कदाचित दहापट जास्त खजिना उरलेल्या या एका दरवाज्याच्या मागे आहे. आणि म्हणूनच हा खजिना मिळवणे जास्त अवघड आहे.त्याच बाबतीत काहीजण हे म्हणतात की , दुप्पट तिप्पट दहापट हा अंदाज लावणं मूर्खपणा आहे . या वॉल्ट मध्ये असं काहीतरी अगम्य – अलौकिक आहे ज्याचा कधीच कुणीच विचार केला नसेल. विचारांच्या पलीकडे काहीतरी आहे. तिथवर आपण न गेलेलंच बरं…

सुप्रीम कोर्टाचा निर्णय..

आधी १९९१ …. मग २०११ …. मग आता २०२० या तिन्ही वेळेस हे मंदिर सुप्रीम कोर्टाच्या पायऱ्या चढून आलंय. सर्वात शेवटी अलीकडेच १३ जून २०२० साली सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला. मंदिर कोण सांभाळेल ? कुणाच्या अधिकारात या मंदिराची जबाबदारी असेल ? यावर सुप्रीम कोर्ट म्हणालं की ‘उत्तराटम तिरूनल मार्तंड वर्मा ‘ यांच्याकडेच ते राजपरिवारातून येत असल्याने मंदिराची जबाबदारी राहील. मात्र मंदिराच्या कुठल्याही संपत्तीवर त्यांचा काहीही मालकी हक्क नसेल. मंदिराची सर्व देखरेख तेच करतील.

पण सहाव्या दरवाजाचं काय ? तो उघडायचा की नाही ? यावर कोर्ट काहीच बोललं नाही. काहीही निर्णय दिला नाही. तूर्तास त्याकडे कुणीही जाऊ नका असा कोर्टाचा निर्देश दिसत होता. त्यावर कदाचित पुढच्या काळात कोर्ट निर्णय देईल…… कदाचित देणारही नाही…..

कोर्टाच्या याच भूमिकेमुळे मात्र या रहस्याबद्दल अजून उत्सुकता वाढते. की हे प्रकरण देशातल्या सर्वात मोठ्या न्याय व्यवस्थेकडे आहे. इतकी सशक्त असूनही ही व्यवस्था यावर स्पष्ट निर्णय देऊ शकत नाहीये . मग असं खरंच काय आहे या ठिकाणी ?

इथे मात्र ना कोर्टाला दोष देता येत … ना जनतेला ! कारण जनतेची उत्सुकता चाळवली जाणे साहजिकच आहे. आणि कोर्टावरही सगळ्यांचीच जबाबदारी आहे. कारण जर कोर्टाने उद्या निर्णय दिला … की उघडा दरवाजा … ! आणि … सगळी मिथके वगळून…. जर एखादी नैसर्गिक आपत्ती सुद्धा ओढावली आणि जर त्यात नुकसान झालंच …….. कोण जबाबदारी घेणार ? आणि नुकसानही किती होईल … काय होईल हे कुणाला माहिती ? आणि अधिक …. नुकसान कुठवर होईल ? मंदिरापुरतं ? तिरुवनंतपुरम पुरतं ? केरळ पुरतं ? भारतापुरतं ? की सगळ्या जगावरच नामुष्की ओढावेल ? कारण जर व्हायचंच तर तर मग काहीही होऊ शकतं ! हा सगळा विचार कोर्टाला करावाच लागेल. म्हणून तेही अडचणीतच असावेत !

हा दरवाजा बंद कसा केला गेला असावा आणि याला कोण उघडणार याही बाबतीत अनेक थियरी मांडल्या गेल्या आहेत. एका वैज्ञानिक थियरीचा आधार घेऊन ही गोष्ट समोर आली आहे की , काही विशिष्ट मंत्रांचं उच्चारण करून , यज्ञ करून हा दरवाजा बंद केला गेला आहे. आणि आता गरुड मंत्रांचा जप करूनच हा दरवाजा उघडला जाऊ शकतो. मी वैज्ञानिक यासाठी म्हणालो की निसर्गतः गरुड आणि साप यांचं नातं कसं आहे ? बघा..

तसच , हा दरवाजा एका विशिष्ट साऊंड फ्रिकवेंसी द्वारे लॉक केला गेला आहे अशीही पक्की मान्यता आहे. आणि त्याच – तशाच साऊंड वेव्ह द्वारेच तो पुन्हा उघडता येऊ शकतो.

आणि एक तर सर्वात डॅशिंग मान्यता ….. कलियुगात अवतरणारा कल्की हा अवतारच हा दरवाजा उघडणार !

अनेक मिथकं आहेत. अनेक थियरिज आहेत. अनेक बाबी … अनेक गोष्टी… आणि फक्त एक दरवाजा ! उघडेल का हा दरवाजा खरंच ? उघडला तर काय असेल आतमध्ये ? काहीतरी सामान्य की काहीतरी अलौकिक ? काय होईल त्याने ? खजिन्यातील संपत्तीत वाढ … की मोठा प्रलय ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: