आश्वस्त
गिरीशला लहानपणापासून हनुमानाचे वेड. कसे लागले, कुठून लागले काहीच माहिती नाही. लहानपणी आजी तुळशीबागेत रामाच्या मंदिरात जायची तेव्हा हा तिच्याबरोबर जायचा आणि रामाला नमस्कार केल्यावर हनुमानाजवळ बसून राहायचा. बराच वेळ त्याला हनुमाना शेजारी बसायला आवडायचं. हातात गदा घेतलेले ते हनुमानाचं लोभस पाहून त्याला काहीतरी आतून व्हायचं एवढं नक्की ! आजीने त्याला पंचधातूंनी बनलेली हनुमानाची छोटीशी मूर्ती तेव्हा घेऊन दिलेली. हा ती मूर्ती स्वतःजवळ कायम ठेवायचा.
जेव्हा कधी हनुमानाची मंदिरे त्याला रस्त्यावरती दिसायची, तिथे न चुकता तो नमस्कार करायचा. त्याच्यासाठी शनिवार आणि मंगळवार असे दोनच हनुमानाचे वार कधीच नव्हते, प्रत्येक दिवशीच त्याला हनुमानाची ओढ लागायची. आजीला विचारायचा तो, ‘आजी, ह्या मूर्तीत खरंच हनुमान आहे का?’ आजी चे हो ऐकले कि खुश होऊन हनुमानाच्या पायाला हात लावून म्हणायचा, “मारुतीराया, दर्शन दे कि रे मला..’
लहानपणी त्याच्याकडे फक्त एकच खेळणं होतं ते म्हणजे हनुमानाची गदा! प्लास्टिकची पण खूप मजबूत होती ती. तीच घेऊन सगळीकडे फिरायचा आणि मोठ्याने म्हणायचा ‘जय श्रीराम’ … त्याच्या दृष्टीने त्याला गदे सोबत खेळणे आणि भरपूर व्यायाम करणे एवढेच त्याला माहिती होते.
त्याने व्यायामाचा कधीच कंटाळा केला नाही. जेव्हा कधीच टीव्ही वरती रामायण लागायचे, तेव्हा मन लावून पाहायचा आणि सतत ‘रामा’ चा जप करायचा. आजी गेली तरी तो सारखा आईबाबांना विचारायचा, ‘मला कधी माझा हनुमान मला कधी दिसेल का?’
आई तेव्हा हसून म्हणायची कि, ‘वेळ आली कि येईल भेटायला’
बालपण संपले, हा मोठा झाला तरी हनुमानाची भक्ती तशीच होती. पुढे गावातले घर सोडून हा कोथरूडला एका मोठ्या सोसायटीत राहायला गेला. तिथला त्याला फ्लॅट आवडला याचे मुख्य कारण की त्या सोसायटीच्या आवारात हनुमानाचे सुंदर मंदिर होते . ते सगळे फ्लॅट पाहायला गेले होते आणि फ्लॅट पेक्षा गिरीश ला मंदिर खूप आवडले म्हणून त्याच्या बाबांनी तिथे फ्लॅट बुक केला.
पुढे गिरीश चे शिक्षण होऊन जॉब लागला. दररोज ऑफिसला जाताना आणि ऑफिसवरून आल्यावर हनुमानाचे दर्शन घेतल्याशिवाय हा काही परतायचा नाही. हनुमानाशी जणू हा दिवसभराच्या गप्पा मारायचा. मंदिरात बसल्यावर कधीतरी त्याला प्रश्न पडायचा कि, ‘हा हनुमान आहे का खरंच का मी एकटाच मूर्तीशी बोलत असतो?’ मंदिरात बसल्या बसल्या म्हणायचा तो, ‘कधी तू असल्याची प्रचीती दे कि रे हनुमाना’ पण मूर्ती काही बोलायची नाही. तरी त्याचा हा बोलण्याचा नेम त्याने सोडला नाही.
त्याचे काही काळाने कंपनीत प्रमोशन झाले आणि त्याला कंपनीने जर्मनीला पाठवले. अजून लग्न वगैरे व्हायचे होते बाकी काही पाश नव्हते त्याच्यामुळे हा सुखासुखी तयार झाला. याचे सामान पण कमी होते पण त्यात पंचधातूंनी बनलेली त्याची ती मूर्ती आठवणीने जवळ ठेवली होती.
जर्मनीला गेल्यावर रुटीन बसायला वेळ लागला. याला काही दिवस झोपच लागायची नाही पण हळूहळू त्याचा जम बसला. काम इंटरेस्टिंग होते त्याच्यामुळे कामात दिवसभर त्याचा वेळ सहज जायचा. कंपनीने त्याला क्वार्टर्स प्रोव्हाइड केले होते त्याच्यामुळे ऑफिसमधून आल्यावर अगदी निवांत पणे त्याचा वेळ जायचा. तिथे त्याचा एक ग्रुप तयार झाला. हा ग्रुप नेहमीच एडवेंचर ऍक्टिव्हिटी करायचा, कधी सायकलींग, कधी रेसिंग, कधी माऊंटन हायकिंग तर कधी स्विमिंग!
थोडासा बुजरा असलेला गिरीश हळूहळू यांच्यामध्ये मिसळला.
गिरीश धरून सात जणांचा ग्रुप तसा फार ऍक्टिव्ह होता. कधी हे लोक रात्रभर एडवेंचर करत बसायचे.
इकडे आल्यावर मात्र त्याचे हनुमान मंदिरात जाणे बंद झाले होते आणि त्यामानाने हनुमानाची आठवण काढणे पण कमी झाले होते. आईबाबांना तसे अधून मधून सोसायटीच्या हनुमान मंदिराबादल फोन वर विचारायचा पण तिथे असतानाचा त्याचा नेम इथे मात्र राहिला नव्हता. तसेही या परदेशात त्याच्या कामात तो स्वतःला जास्त मग्न ठेवायचा. टोटल २ वर्षांचे त्यांचे प्रोजेक्ट होते. काम भरपूर असल्याचे पण सुट्टी मिळाली का हा ग्रुप वेळोवेळी काही ऍक्टिव्हिटी करायला जायचा.
प्रोजेक्ट सुरु होऊन १० महिने जवळपास झाले होते. यावेळेस लॉन्ग विकेंड होता. कामातुन जरा ब्रेक मिळेल म्हणून सगळ्यांचे आल्पस मध्ये जायचे ठरले. यावेळेस त्यांनी आल्पसमधली ऑस्ट्रिया आणि स्लोवेनिया याच्यामध्ये असलेली एक रेंज ठरवली होती. आवश्यक साहित्य घेऊन ते सगळेजण आल्पसच्या चढाईला गेले. सगळे तसे मजबूत धडधाकट आणि दणकट त्यामुळे कोणाला काही त्रास होईल अशी काहीच शक्यता नव्हती. त्यातून जवळ जवळ पाच दिवस सुट्टी असल्यामुळे पहिल्या दिवशीच त्यांनी बेस कॅम्प पर्यंत मजल मारली होती. अंदाजे बारा हजार फुटापर्यंत चढायचे होते.
लॉंग विकेंड म्हणून ते गेले पण वातावरणाचा अंदाज त्यांना एवढा आला नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून जॅकेट्स, शूज, हँडग्लोव्हस आणि नाईट व्हिजन गॉगल घालून त्यांनी चढायला सुरुवात केली आणि त्या दिवशी दुपार पर्यंत ते बऱ्यापैकी दमले होते.
शेवटी एक सोयीची जागा शोधून त्या दिवशी रात्री टेन्ट उभा करून त्यांनी तिथेच थांबायचे ठरवले.
संध्याकाळ पर्यंत सगळे ठीक होते पण रात्री अचानकच वातावरण बदलले आणि बर्फाचा वारा सुरू झाला. सगळ्यांनी जवळ असलेल्या प्रत्येक गोष्टी अंगावरती घेऊन त्या वाऱ्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला पण रात्र अजून जशी दाट झाली तसे वातावरणामधली तापमानाची घट अजून वाढली. किती मायनस डिग्रीपर्यंत टेंपरेचर गेले हे कळलं नाही आणि तिथे सगळ्यांनाच थंडी भरायला सुरुवात झाली. रात्री तिथे होते ते सगळेजण आजारी पडले. नेमकी तिथे मोबाईल रेंज पण नव्हती. बेस कॅम्प पासून ते तसे बरेच वरती होते आजूबाजूला कुठले टेन्ट ही नव्हते ज्यांच्याकडून मदत मागवावी. रात्र कधी जाईल आणि सकाळ कधी होईल याची वाट ते बघत बसले आणि तेवढ्यात काहीतरी मोठा आवाज आला. कोणाला काही समजायच्या आतच बर्फाचा भला मोठा भाग त्यांच्या टेन्ट वरती कोसळला. त्या भागाच्या खाली ते सगळेजण दडले गेले. तिथे जणू हिमनगच तिथे त्यांच्या अंगावर पडला होता. सगळेजण प्रचंड घाबरले. याची कल्पनाच कोणी केली नव्हती. श्वास गुदमरायला लागले, जराशी हालचाल करायला पण त्रास होत होता. अशी बिकट परिस्थिती होती तरी प्रत्येकाने एकमेकांचा हात हातात घेऊन स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न चालू ठेवला होता. जमेल तसा हाताने बर्फ बाजूला सारत असतानाच अजून वरून भरपूर बर्फ पडला, त्यातच त्यांचे हातपाय जाम व्हायला लागले. वातावरण इतके थंड होते की त्यांचे ओठ पूर्णपणे सुकले.
आणि प्रत्येकालाच प्रचंड भीती वाटायला लागली. त्यांच्यातला एक मित्र एकदम जोरात ओरडला बहुतेक तो त्या ढिगार्याखाली अजून गाडला जात होता.
प्रत्येकाने जसं जमेल तसं आरडाओरडा करत मदतीसाठी हाका मारायला सुरुवात केली.
गिरीश सुद्धा प्रचंड घाबरला होता. असा अनुभव त्यांनी कधीच घेतला नव्हता काय करावे त्यालाच कळत नव्हते.
परिस्थीती खूप बिकट होती, जगतोय किंवा आता मरणार हे कोणालाच कळत नव्हते. हात पाय बधीर झालेले होते. पण त्याही पारिस्थिती मध्ये ते एकमेकांचे हात धरून ठेवायच्या प्रयत्नात होते.
तेवढ्यात अजून एक काहीतरी जड भाग त्यांच्या अंगावर कोसळला आणि सगळ्यांची शुद्ध हरपली.
गिरीश चे डोळे बंद होण्यापूर्वी सोसायटी मधील हनुमानाची मूर्ती त्याच्या नजरेसमरून तरळून गेली आणि अचानक डोळ्यावर प्रखर प्रकाश पडला असे जाणवले. पुढे काय घडले कोणालाच कळले नाही.
डोळे उघडले तेव्हा तो एका हॉस्पिटल मध्ये आहे असे त्याला आढळले. आजूबाजूला काही लोकल ट्रेकर होते. सगळ्यांच्या डोळ्यात कुतूहल होते. मनातून आश्चर्य जाणवत होते. गिरीश ने हातपाय झटकत उठून बसण्याचा प्रयत्न केला पण अचानक शरीरातून कळ जाणवली .
त्याचे सगळे साथीदार बाजूला निपचित पडून होते, तो घाबरला आणि कसा बसे बळ आणत त्याने एकाला नुसते खुणेने विचारले, तसे त्याने सांगितले की ते सगळे ठीक आहेत तेव्हा ह्याच्या मनाला शांतता मिळाली.
पण आपण इथे कसे आलो हेच त्याला कळेना.
“आम्ही इथे कसे काय?” त्याने न राहवून विचारले.
“It’s a miracle!” कोणीतरी म्हणले.
नक्की काय कळेना, शेवटी आशेने त्यांच्याकडे बघत असताना एक जण बोलला ” काल रात्री खूप मोठा बर्फाचा कडा कोसळला होता तुम्ही त्यावेळी त्या तिथेच होतात. आम्हाला इथे खालती जाणवले की खूप काही होतंय पण काहीच करू शकत नव्हतो. पण काय, कसे कळले नाही आणि आम्हाला अचानक वादळ आले नी सगळे अंधुक झाले. इथे पण सोसाट्याचा वारा होता. इथे काय झाले नक्की माहिती नाही पण वरती काहीतरी हालचाल इथे झाली होती. त्यानंतर काय झाले कोणालाच कळले नाही पण जेव्हा वादळ शमले तेव्हा अचानक पणे तुम्ही लोक बेस कॅम्प मध्ये पडलेले दिसले. तिथून आम्ही तुम्हाला इथे हॉस्पिटल मध्ये घेऊन आलो “
गिरीशचा या बोलण्यावर विश्वास बसेना कारण ते सगळे मृत्यूच्या दारातून परत आले होते. काय झाले असेल याचे आश्चर्य तो करीत होता.
काही वेळाने सगळे जण शुद्धीवर आले. प्रत्येकाला प्रथमोपचार मिळाले होते. सगळ्यांना लगेच आवश्यक त्या तातडीच्या सेवा हॉस्पिटलमध्ये दिल्या जात होत्या.
गिरीश पण हॉस्पिटलच्या एका बेड वर पडून समोर सुरू असलेला टीव्ही पाहत होता. टीव्ही वर सुरू असलेल्या बातम्या मध्ये कालच्याच कोसळले बर्फाच्या डोंगराची बातमी होती. बहुतेक ठिकाणी हीच चर्चा होती. बातम्या पाहत असताना तो अचानक टणकन उठून बसला. त्याने ती बातमी पाहायला सुरुवात केली आणि अक्षरशः हादरला.
बातम्यांमध्ये दाखवत होते काल सायंटिस्टची एक टीम आकाशातील काही तारे बघत असताना त्यांच्या टीम मेम्बर्स ने बर्फाचा डोंगर कोसळत असतानाचे काही फोटो आणि व्हिडिओ काढले होते. त्यांचे फुटेज न्युज वाल्यांच्या हातात लागले होते. त्यांनी काढलेल्या अनेक विडिओ आणि आणि फोटो मध्ये असे काही दिसत होते एक महाकाय आकृती त्याच्या खांद्यावर काही लोकांना घेऊन त्या डोंगरावरून उतरत होती. अंधारात सगळेच फोटो क्लियर आले नव्हते पण न्युज वर चर्चा करणारे सगळे जण त्या आकृतीला बघत एक भले मोठे माकडसदृश प्राणी आहे असे म्हणत होते.
ती छायाचित्रे टी व्ही वर पाहिल्यावर गिरीश अक्षरशः रडायला लागला. त्याच्या डोळ्यातून पाणी थांबेना. बाकीचे लोक त्याला विचारायला लागले की काय झाले पण हा फक्त रडत होता. रडता रडता तसाच तो उठला आणि त्याच्या बाजूच्या शेल्फ मध्ये ठेवलेल्या बॅगेत हात घातला. थोडे चाचपडल्यावर त्याच्या हातात तो वस्तू आली. तिला घट्ट पकडून आपल्या आसवांचा अभिषेक तो त्या गोष्टीवर मी करायला लागला.
‘तू आलास .. इतके दिवस वाट पाहात होतो कि, कधी येईल-कधी येईल आणि तू खरंच आलास ! मला वाचवायला आलास! लहानपणापासून सारखं वाटायचे कि तू आहेस ना? आणि जर आहेस तर दिसत का नाहीस? आणि आई म्हणायची त्या प्रमाणे खरंच योग्य वेळेला आलास. मारुतीराया, हनुमाना, बजरंगबली तू आहेस. भारत असो का जर्मनी, ऑस्ट्रिया असो कि स्लोव्हेनिया तू आहेस, सतत आहेस, कायम आहेस! मीच वेडा विचार करत राहायचो, तू खरंच आहेस का आणि असल्यास प्रचिती का देत नाहीस? काल सगळ्या शंका मिटवल्या तू माझ्या देवा! ‘
त्या बोलण्याने हातात असलेल्या ती पंचधातूची मूर्ती त्याला अलगद हसल्या सारखी वाटली.
या परदेशात कोणाला कितपत समजेल हे माहिती नव्हते पण त्याला मात्र हे नक्की कळले होते काल रात्री त्याला वाचवायला त्याचा परमप्रिय ‘हनुमानबाप्पा’ आला होता! त्याच्या अस्तित्वाने गिरीश कायमस्वरूपी ‘आश्वस्त’ झाला होता.
जय श्रीराम🙏
©®अमित मेढेकर
