तिला तुमच्यासारखी सासू मिळाली तर..

“अगं, कुठे लक्ष आहे तुझं? दूध उतू गेलं ना!” सुमतीबाईंचा आवाज ऐकताच ऋतू धावत किचनमध्ये आली. ध्रुवाची टिफिन बॅग वरुणच्या हातात देऊन ती धावली खरी, पण तोपर्यंत उशीर झाला होता. ‘हत् तेरी! आजही ध्रुवाचा नीट निरोप घेता आला नाही, त्याला टाटा करायचा राहून गेला,’ याच विचाराने तिच्या मनाला रुखरुख लागली.
“अर्ध्यापेक्षा जास्त दूध वाया गेलं… आता चहासाठी पुन्हा दूध आणावं लागेल,” नेहमीप्रमाणे सुमतीबाईंनी टोमणा मारलाच. त्यांना उत्तर देऊन काही उपयोग नाही हे माहीत असल्याने ऋतू गप्प राहिली आणि गॅस-ओटा साफ करू लागली. एका बाजूला चहा आणि दुसऱ्या बाजूला पोहे गरम करायला ठेवले. नाश्ता तयार झाला तसे सगळे डायनिंग टेबलवर जमले. नणंद सुचिताही बाहेर आली.
“वहिनी, आज पण पोहेच का गं?” असं म्हणत तिने बॅग उचलली, तेव्हा बॅगचा कोपरा लागून प्लेटमधील पोहे टेबलवर सांडले.
“अगं हळू, आणि नाश्ता न करता कुठे निघालीस?” ऋतू म्हणाली.
“आई, तुला तर माहीत आहे मला पोहे आवडत नाहीत,” सुचिता फणकाऱ्याने बोलली.
“बरं जा, कॉलेजमध्ये समोसा वगैरे खाऊन घे,” सुमतीबाई प्रेमाने म्हणाल्या आणि सुचिता निघून गेली.
ऋतूचं रोजचं वेळापत्रक ठरलेलं होतं. ध्रुवाची बस पावणेआठला यायची, तर तिला स्वतःला साडेनऊला ऑफिसला निघावं लागायचं. स्वयंपाकाच्या रेखाबाई आठ वाजता यायच्या, त्यामुळे सर्वांचा नाश्ता आणि ध्रुवाचा टिफिन ऋतूलाच करावा लागे.
ऋतू व्यवसायाने आर्किटेक्ट. लग्नापूर्वी ती एका मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीत होती. पण ध्रुवाच्या जन्मानंतर “आम्हाला त्याला सांभाळणं जमणार नाही” असं घरच्यांनी सांगितल्यामुळे तिने नोकरी सोडली आणि वर्क फ्रॉम होम सुरू केलं. सुरुवातीला सुमतीबाईंनी साधं गणित मांडलं होतं— “तू घरीच असतेस, मग कामाला बाई कशाला?” हळूहळू त्यांनी स्वतःला कामातून मुक्त करून घेतलं आणि सगळं ओझं ऋतूवर आलं. ऋतू घरून काम करत असली तरी तिला ऑफिसचे टारगेट्स असायचे. सगळ्यांच्या आवडीनिवडी सांभाळताना तिची ओढाताण व्हायची. शेवटी तिने रेखाबाईंना कामाला ठेवलं, तेव्हाही सासूबाईंनी कपाळावर आट्या घातल्याच होत्या.
आता ध्रुवा तिसरीत गेल्यावर ऋतूने पुन्हा ऑफिसला जाणं सुरू केलं होतं. रात्री उशिरापर्यंत ऑफिसचं काम आणि सकाळी लवकर उठून घरची धावपळ यामुळे ती प्रचंड थकायची. संध्याकाळी साडेपाचला घरी आल्यावर पुन्हा तिचं ‘दुसरं शिफ्ट’ सुरू व्हायचं.
एके दिवशी ऑफिसमध्ये मित्र मैत्रिणींसोबत लंच करताना ऋतू उदास होती. तिची मैत्रीण मीताने विचारलं, “काय झालं गं? काही दिवसांपासून तू खूप त्रासात दिसतेयस.” ऋतूने आपलं मन मोकळं केलं. घरातला भेदभाव आणि होणारी ओढाताण ऐकून मीता हसली.
“अगं, ही तर घराघरातली कहाणी आहे. फरक फक्त आपण परिस्थिती कशी हाताळतो यात असतो. सासर समजूतदार मिळणं हे भाग्याचं असतं, पण नसेल तर आपण स्पष्टपणे बोलायला हवं. मनातल्या मनात कुढण्यापेक्षा मार्ग काढलेला बरा.”
मीताने आपला अनुभव सांगितला, “मी लग्नाआधीच कार्तिकला सांगितलं होतं की मला एकटीला घरकाम जमणार नाही. त्यामुळे त्याने कामाची विभागणी करून घरच्या प्रत्येकावर जबाबदारी सोपवली. आज आमच्याकडे एकमेकांसाठी वेळ आहे. प्रश्नांपासून पळण्यापेक्षा त्यांना समोर जाऊन भिडायला शिक.”
ऋतूला मीताचं म्हणणं पटलं. त्या संध्याकाळी घरी आल्यावर तिने ठरवलं की आता स्वतःसाठी उभं राहायचं. तिने चहा ठेवला आणि ध्रुवाकडे गेली.
“ध्रुवा, चल पटकन तयार हो, आपण पार्कमध्ये जाऊया.”
सुमतीबाईंनी विचारलं, “चहा झाला का गं?”
“हो आई, तुम्ही घेऊन घ्या. मी ध्रुवाला घेऊन बाहेर जातेय,” ऋतू शांतपणे म्हणाली आणि बाहेर पडली.
दुसऱ्या दिवशी ऋतू जाणीवपूर्वक थोडी उशिरा उठली.
“वरुण, आज मला उठायला उशीर झालाय. मी नाश्ता बघते, तुम्ही ध्रुवाला तयार करा.” वरुणनेही सहकार्य केलं. ऋतूने किचनमध्ये जाऊन झटपट इडली-सांबार केलं. आज वरुणने मदत केल्यामुळे तिची घाई कमी झाली होती. तिने ध्रुवाला भरवलं, त्याची पप्पी घेतली आणि त्याला आनंदाने निरोप दिला.
मग तिने सासूबाईंना आवाज दिला, “आई, इडली आणि चहाकडे लक्ष ठेवा, मी आलेच.” उत्तर ऐकायच्या आत ती रूममध्ये गेली आणि अर्धा तास व्यायाम केला. बाहेर रेखाबाई आल्यावर सासूबाईंनी स्वतः त्यांना भाजी काय करायची ते सांगितलं. व्यायाम करून बाहेर आल्यावर ऋतूने विचारलं, “नाश्ता झाला का आई?”
“हो, तू आली नाहीस म्हणून आम्ही करून घेतला,” सासूबाई थोड्या नाराजीनेच म्हणाल्या.
तेवढ्यात सुचिता आली, “वहिनी, नाश्ता काय आहे?”
“इडली-सांबार आहे, तू घेऊन घे. मी अंघोळीला जातेय,” ऋतूने उत्तर दिलं. सुचिता बघतच राहिली. नेहमी ताटात नाश्ता वाढून देणारी वहिनी आज स्वतःची कामं करत होती. सुचिताने नाश्ता केला आणि प्लेट टेबलवर तशीच टाकून ती निघाली.
थोड्या वेळाने ऋतू आणि वरुण तयार होऊन बाहेर आले. ऋतूने शांतपणे नाश्ता केला आणि आपल्या प्लेट्स विसळून ठेवल्या. ती बाहेर पडत असताना सासूबाई म्हणाल्या, “हे काय? डायनिंग टेबल स्वच्छ नाही केलास?”
“आई, मला उशीर होतोय, तुम्ही करून घ्या ना प्लीज,” असं म्हणून ऋतू स्मितहास्य करत निघून गेली.
असाच बदल ऋतूने आठवडाभर चालू ठेवला. रविवारी सकाळी ऋतू सुचिताला म्हणाली, “सुचिता, आज नाश्ता तू बनवतेस का? मला बरं वाटत नाहीये.”
“वहिनी, मला नाही जमणार. रेखा मावशींना सांग,” सुचिताने नेहमीप्रमाणे झटकलं.
सासूबाई लगेच म्हणाल्या, “अगं, तिला कशाला सांगतेस? तिचा अभ्यास आहे ना.”
यावर ऋतूने शांतपणे पण ठामपणे सुचिताच्या डोळ्यात बघून म्हटलं, “आई, आज तिचा अभ्यास आहे, उद्या ती नोकरी करेल. लग्नानंतर तिलाही घर आणि नोकरी दोन्ही सांभाळावं लागेल. आणि चुकून तिला जर तुमच्यासारखीच सासू मिळाली, तर माझ्यासारखीच तिचीही रोज बोलणी खाऊन ओढाताण होईल ना? मग तिला आतापासूनच सवय नको का?”
ऋतूचं हे वाक्य ऐकून घरात शांतता पसरली. सुमतीबाईंना आपला भेदभाव आणि ऋतूवर होणारा अन्याय पहिल्यांदा प्रकर्षाने जाणवला होता.
लेखिका: वैशाली गोस्वामी #अंतरंगमनाचे

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.