वधूपक्षाची खोली

मामाने दिलेली सिल्कची पिवळी गर्भरेशमी कांजीवरम साडी नेसून अस्मिता बाहेर आली. मोत्याच्या आणि फुलांच्या मुंडावळ्या तिच्या गोल चेहऱ्याला शोभून दिसत होत्या. हलकासा मेकअप असूनही मूळचीच सावळी-गोरी अस्मिता देखणी दिसत होती. आई-वडिलांनी घातलेले, रात्री सीमांतपूजनाला आणि साखपुड्याच्या वेळी केदारकडून दिलेले सगळे दागिने तिने अंगावर घातले होते. ती बाहेर आली तशी जवळ उभ्या असणाऱ्या मावशीने आपल्या डोळ्यांमधील काजळ तिच्या कानामागे लावले.
आईने लांबूनच भरून आलेले डोळे टिपले. रुखवताचे जेवण सुरु होत होते. आई बाहेर गेली.
“चला चला ….वधूला गौरीहराचा पूजेला बसवा… लग्नघटिका जवळ आलीये…” बाहेरून गुरुजींचा आवाज आला.
अस्मिताच्या काकूने तिच्या हाताला धरून तिला पुजेजवळ नेले. पाटावर बसायला सांगून म्हणाली, “अस्मिता, हि गौरीहराचा पूजा शेवटची, मग लग्नघटिका. आता तू ह्या खोलीत येणार ती निघताना नमस्कार करायला. निघताना पुजेमधले बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा न्यायची. गडबडीमध्ये विसरशील पण लक्षात ठेव आणि हो लगेच सासूबाईंच्या किंवा कोणा मोठ्या माणसांच्या हातात दे. चांदीच्या मूर्ती… इकडेतिकडे राहून जातील आणि सापडणार नाहीत.”
अस्मिताने हुंदका मागे सारत काकूला “हो” म्हणून मान डोलावली.
मावशी तिच्या शेजारी पाटाजवळ बसत म्हणाली, “हे बघ, गौरी-हराची म्हणजे शंकर-पार्वतीची पूजा मांडली आहे. आज बाळकृष्ण हे शंकराचे व अन्नपूर्णा हे पार्वतीचे प्रतिक आहे. हि छोटी तांदुळाची रास, इंद्रपत्नी ‘शची’ हिचे प्रतीक म्हणून मांडतात. ‘इंद्राच्या पत्नीला जसे विवाह भाग्य मिळाले, आरोग्य लाभले व पुत्रप्राप्ती झाली, तसेच मलाही मिळो’ अशी प्रार्थना वधू ‘शची’ला करते. मी श्लोक म्हणते, तू हळद-कुंकू वहा.”
देवेंद्राणी नमस्तुभ्यं देवेंद्र प्रियभामिनी
विवाहं भाग्यम् आरोग्यम् पुत्रलभंच देही मे
मावशीने छान मोठ्या आवाजात श्लोक म्हणला. सगळ्यांनीच हात जोडले.
“काय गं, तुझा कसा हा श्लोक पाठ आहे?”
“इतरवेळीही अखंड सौभाग्य मागताना म्हणतात म्हणून” मावशीने ठसक्यात सांगितले.
आता अस्मिताला शेजारी ठेवलेल्या वाटीमधील तांदूळ चिमूट चिमूट तांदुळाच्या राशीवर वहायला सांगितले आणि सगळे वाट पाहत बसल्या.
काकू शेजारच्या खुर्चीत बसत म्हणाल्या, “आता कसं सुटसुटीत आहे पहा. आमच्यावेळी माझ्या माहेरी अंगणात लग्न झाले. माहेरच्या देवघरातच गौरीहार पुजला होता मी. पूर्वी पूजा मांडण्यासाठी दगडी पाटयाचा वापर होई. पाटयावर हळदीने गौरीहराची प्रतिमा काढून तांदुळाच्या राशींवर शंकर पार्वतीच्या म्हणजेच बाळकृष्ण व अन्नपूर्णेच्या छोटया मूर्ती ठेवल्या जायच्या.”
तेवढ्यात दुसरी काकू आत मध्ये आली. “अगोबाई, गौरीहरची पूजा सुरूही झाली. अस्मिता, संसार सुखाचा व्हावा, पतीबरोबर उत्तम मनोमिलन व्हावे म्हणून प्रार्थना कर गौरीहरला.”
© सौ आरती अत्रे-कुलकर्णी

थोड्यवेळातच मुलाकडून अर्धे केळे आणि कपमध्ये अर्धा कप दूध आले. सगळ्यांनी लगेच ते अस्मिताला खायला आणि प्यायला लावले. खरेतर तिला कशाचीच इच्छा होत नव्हती. मनामध्ये काहीतरी होत होते, काया थरथरत होती, घाम येत होता, रडायलाही येत होते, पावले जड झाली होती….
बाहेर वाद्यांचा, गाण्याचा गडबडीचा आवाज जोरदार येत होता. तेवढ्यात धाकट्या काकूने तिच्या हातात फुलांचा हार आणून दिला. डोक्यावर टोपी घालून मामा आत आला. मोठ्या काकूने तिच्या अंगावरील शेला सारखा केला. मावशीने तेवढ्यात तिचा चेहरा हलक्या हाताने टीशूने टिपला.
मामाने तिच्या हातावर आपला हातात सावकाश ठेवला. तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, “निघूया..?”
अस्मिताने मानेनेच होकार दिला.
आता कुठे पाहण्याचा कार्यक्रम झाला. होकार आले आणि आज अग्न…. अजूनही स्वप्न वाटावे इतके साधे सहज आणि भराभर घडले. थोडीशी अबोल पण केदारसोबत मोकळी होत जाणारी अस्मिता केदारला खूपच आवडली.
अजून अस्मिताला केदारशी खूप बोलायचं होत, सांगायचं होत…तोवर लग्नच!
लग्नानंतरही तो तसाच असेल ना? का बदलेल? अस्मिता विचार करत होती.
तिच्या मैत्रिणी बहिणी तिच्या आजूबाजूला जमल्या. कोणी तिची मस्करी करत होते, तर कोणी स्वतःचेच फोटो काढत होते. आंतरपाटापलीकडचे अस्मिताला काहीच दिसत नव्हते. एकदोनदा तिने मान वर करून पाहिले पण इतकी गर्दी होती, गलका होता कि तिने पुन्हा मान खाली घातली.
मंगलाष्टके सुरु झाली. मावशी, काकू मोठ्या उत्साहाने गात होत्या. आजूबाजूला चिवचिवाट होता. कोणी अक्षता अंगावर टाकत होते तर कोणी पायाने अक्षदांशी खेळात होते. लहान मुले उगाचच पळत होती. शेवटी गुरुजींच्या खणखणीत आवाज “त्ममेव लग्नम ….” सुरु झाले.
“शुभमंगल सावधान…..” आणि एकच गोंधळ उडाला.
आंतरपाट दूर झाला. समोर केदार उभा होता. शांत, हसरा, तिच्याकडे पाहणारा. तिला जरा बरे वाटले. ती हसली तसा तोही हसला. अस्मिता वाकली तसे त्याने तिच्या गळ्यात हार घातला. केदारही वाकला तसे त्याचे भाऊ, मित्र त्याला उंच करू लागले, उचलून घेऊ लागले. अस्मिता थबकली, तिथेच थांबली. केदारने सगळ्यांना थांबवले आणि शांतपणे अस्मिताच्या समोर मान वाकवून थांबला. तिला जरा बरे वाटले आणि तिने पटकन त्याच्या गळ्यात माळ घातली.
पुढचे विधी सुरु झाले.
मांडीला मांडी लावून केदारजवळ बसताना एक गोड शिरशिरी अस्मिताच्या अंगावर आली.
विधीसाठी उभे राहताना केदार आधी उठला आणि त्याने पटकन आपला हात तिच्या हातात दिला आणि तिला उठायला मदत केली.
तिच्या लक्षात आले नव्हते तर केदारने तिला शेल्याची आठवण करून दिली आणि तिने शेला नीट सावरला.
मध्येच आपला रुमाल तिला काढून दिला जेव्हा ती डोळ्यांमधले पाणी हाताने पुसत होती.
विधी संपले आणि भेटायला येणाऱ्या माणसांची रांग लागली.
बसायलाही वेळ मिळेना. मध्येच कोणीतरी पाणी आणून दिले तेवढेच….
केदारने त्याच्या मावस बहिणीला जवळ बोलावून कानात काहीतरी सांगितले. तिने जरा वेळातच पुलाव आणि गुलाबजाम एका पानात आणले.
केदारने सर्वाना नमस्कार करत म्हणाला “आम्ही आता जरा खोलीत जाऊन येतो. अस्मितालाही साडी बदलायची आहे.”
© सौ आरती अत्रे-कुलकर्णी

अस्मिताच्या हातात हात घेत केदार वधूच्या खोलीकडे गेला. सोबत तिची मावशी होती. तिच्या हातात ते ताट देत केदार म्हणाला, “अस्मिता हे खाऊन घे. आपल्याला जेवायला अजून वेळ आहे. आमचे सकाळी रुखवताचे जेवण झाले आहे पण तू काहीच खाले नसणार.”
अस्मिताने चमकून केदारकडे पाहिले. मी खाल्ले नसणार, हे त्याला माहिती आहे? हा माझा चेहरा वाचतो कि काय? ह्याला माझी खरंच किती काळजी आहे! लहान लहान गोष्टींकडेही ह्याचे लक्ष आहे. आणि हो, केदार असाच आहे. आधीही, आजही…. उद्याही!
“मला रिकामे ताट दाखव…जात नाही म्हणून खाणार नाहीस तू! ” केदार चक्क तिला ओरडला.
अस्मिताला हसायलाच आले.
मावशी, “माझी पुढची साडी घेऊन तूच ये ना तिकडे. मी केदारसोबत तिकडेच जाते.”
आणि… अजूनही हातात हात असलेल्या केदारने तिचा हात घट्ट दाबला.
“झाली बाई अस्मिता तिकडची…” असे मावशी मोठ्याने हसत म्हणाली. आजुबाजुचेही त्या हसण्यात सामील झाले.
“निघताना बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा घेऊन जा न विसरता…” काकू आतूनच आठवण करून देत म्हणाली.
वरपक्षाच्या खोलीत जाताना त्यांची पावले अगदी एकसारखी पडत होती, गालावर हलकेच हसू आणि हात घट्ट गुंफलेलेच होते.
आता हि खोली काय आणि ती खोली काय, दोन्हीकडे माझी सारखीच काळजी आणि प्रेम करणारी माणसे आहेत, ह्याची खात्री अस्मिताला पटली होती.

© सौ आरती अत्रे-कुलकर्णी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.