अंतर
तो तिला तिच्या, आई – बाबांकडे सोडायला आला होता. दहा दिवसांपूर्वीच, लग्न झालं होतं त्यांचं… अरेंज्ड मॅरेज. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी असलेली सत्यनारायणाची पूजा आटोपून, लगेच पुढल्या दिवशी पहाटे असलेल्या फ्लाईटने… ते कोचीनला गेले होते. तिथून मुन्नारला त्यांचा, आठवड्याभराचा स्टे होता.
अत्यंत सुंदर वातावरण होतं मुन्नारला. खूप उत्सुकता होती दोघांनाही, त्या एका खास क्षणाची. कारण लग्न झाल्यापासून, फक्त दोघेच एकत्र असे नव्हतेच ते. पण आता मात्र, कुठलाही अडसर नव्हता दोघांच्यात. ह्याच मनाला गुदगुल्या करणाऱ्या विचारांत, दोघांनी प्रवास पार पाडलेला. आणि ते त्यांच्या हॉटेल रूममध्ये पोहोचले, ते तिचं अनईझी वाटणं घेऊनच.
पुढे मग उलट्याच सुरु झाल्या होत्या तिला. त्यामुळे अशक्तपणा आला… त्यात ताप चढला… तो वाढत गेला. तिथल्याच एका डॉक्टरकडे, औषध पाणी करावं लागलं होतं तिचं. मुन्नारमधला त्यांचा सगळा मुक्काम, असा तिच्या आजारपणातच गेला होता. आणि ह्या सगळ्यात, त्याने खूप काळजी घेतली होती तिची.
तिचा ताप बघण्यावेळी, तिच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवण्यावेळी, तिला धरून टॉयलेटला नेण्यावेळी… तिचा जो स्पर्श होतं असे त्याला तेवढाच काय तो. बाकी मग ती गुंगीतच असे… पण एवढ्या शुद्धीत नक्कीच की, तिला कळावं आपल्या अंगाला कुठल्याही विशिष्ट उद्देशाने स्पर्श होत नाहीये. हायसं वाटे तिला मग.
खरंतर त्या विशेष क्षणाची, तिलाही अर्थातच प्रतिक्षा होती… पण त्या तशा स्थितीत, तिला ते तसलं काहीही नको होतं. आणि त्यातूनही तो बळजबरी करत, आलाच असता जवळ त्या हेतूने… तरी काय करू शकणार होती ती? पण त्या सातही दिवसांत, कधीच त्याने त्याचा तोल ढळू दिला नाही… जेव्हा की पाचव्या दिवशी ती बऱ्यापैकी चालू, बोलू लागली होती.
परतीच्या फ्लाईटमध्येच, तीने त्याला विचारलं की… “मला माझ्या आईकडे सोडशील, चारेक दिवस? तिची खूप आठवण येतीये”. त्यावर तो काहीच बोलला नव्हता. एअरपोर्टवर उतरल्यावर मग त्याने, त्याच्या घरी फोन करून सांगितलं की… तिला तिच्या आईकडे सोडून, तो येईल घरी. आणि आता तो तिच्याच घरी बसला होता, तिच्या आई – बाबांशी छान गप्पा मारत.
म्हंटलं तर अख्खा हनिमून, वायाच गेला होता त्यांचा. त्यामुळे स्वाभाविकपणे, त्याचा मूड सुद्धा ऑफच होता. पण तिच्या आई – बाबांसमोर मात्र… ना तसं किंचितही दाखवलं होतं त्याने, ना कणभरही कोणाला काही जाणवू दिलं होतं. तीने त्याला आधीच विनंती केली होती… तिच्या ह्या अशा अचानक तब्येत बिघडण्याबद्दल, दोघांच्याही घरी काहीही न बोलण्याची.
तिला जाणवत होतं हे की… इतकं सगळं स्वतःच्या मनाविरुद्ध घडूनही, तो तिचं मन मात्र राखत होता… ते ही अगदी मनापासून, तिच्यावर उपकार करत असल्याचा आव वगैरे आणत नाही. तिच्या आई – बाबांशी दिलखुलास गप्पा मारणाऱ्या, हसत-खेळत वागणाऱ्या त्याला लांबून बघून… ती आज खऱ्या अर्थी त्याच्या प्रेमात पडली होती.
स्वतःच्याच नकळत ती गुणगुणु लागली, जगजीतची एक गझल… ‘प्यार का पहला ख़त लिखने में, वक़्त तो लगता है’. गझलेचं पहिलं कडवं, मनात म्हंटलं तीने… आणि चमकून पाहिलं त्याच्याकडे. तेच कडवं मग तीने पुन्हा म्हंटलं, नी परत त्याच्याकडे पाहिलं. तिच्या मनात आलं… किती चपखल लागू होतंय, हे कडवं ह्याला.
तितक्यात त्यांनेही बघितलं तिच्याकडे… आणि किंचितशी जीवणी पसरवून, हसला तो. ती सुद्धा हसली मग… पण जीवणी व्यवस्थित पसरवून. आणि परत एकदा तेच कडवं, मनातल्या मनात गायलं तीने… ‘जिस्म की बात नहीं थी, उनके दिल तक जाना था.. लंबी दूरी तय करने में, वक़्त तो लगता है.. प्यार का पहला ख़त लिखने में, वक़्त तो लगता है’. दोघांमधील अंतर मिटवण्यासाठी, त्याने खरंच मोठा पल्ला गाठला होता… समंजसपणे, उमेदीने.
आणि ती उभी होती, त्या जागेवरूनच जोरात बोलली तिच्या आईला… “आई… जेवण झालं की आम्ही निघू गं… पुन्हा कधीतरी येईन, चार दिवस ह्या घरी राहायला… पण आज जाते घरी… माझ्या घरी”. त्याने चमकून पाहिलं तिच्याकडे… आणि मनोमन सुखावून, आता अगदी मोकळेपणाने हसला तो ही.
लेकीच्या वाहत्या डोळ्यांकडे बघून, तिची आई काय समजायचं ते समजली… नी स्वतःही भरल्या डोळ्यांनी जागची उठत, स्वैपाकाला लागायला म्हणून आत जाऊ लागली.
♥️♥️♥️
–सचिन श. देशपांडे
