बदल
पूनमची सकाळपासून धावपळ सुरू होती. घर सजवलं होतं, दारात फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या आणि औक्षणाचं ताटही तयार होतं. आज तिची नजर सारखी दाराकडे आणि घड्याळाकडे वळत होती. कारण आज तिच्या सासूबाई कॅन्सरवर मात करून, दवाखान्यातून कायमच्या घरी येणार होत्या.
दारावरची बेल वाजली आणि पूनमने आनंदाने दार उघडले. जमलेल्या सगळ्यांनी ‘सरप्राईज’ म्हणत सासूबाईंचे स्वागत केले. पूनमने त्यांचे औक्षण केले आणि त्यांना मिठी मारली. सासूबाई हे सगळं बघून भारावून गेल्या होत्या. “पूनम, कशासाठी ग हे सगळं?” त्यांनी विचारलं.
पूनम म्हणाली, “आई, ही तुमची जिद्द आणि सकारात्मकता जिंकली आहे. तुम्ही कॅन्सरला हरवून आलात, म्हणून हे स्वागत तर झालंच पाहिजे!”
सगळ्यांच्या गप्पा सुरू असताना पूनमची तीन वर्षांची लेक, काव्या धावत आली. आजीला बघून तिला खूप आनंद झाला, पण तिने एक निरागस प्रश्न विचारला, “आजी, तू घरात स्कार्फ का बांधलायस? इथे तर ऊन नाहीये.” सासूबाई गोंधळल्या, पण पूनमने वेळ मारून नेली, “बाळा, आजीला वारा लागू नये म्हणून तिने स्कार्फ बांधलाय.” प्रत्यक्षात, कीमोथेरपीमुळे सासूबाईंचे पूर्ण केस गेले होते, हे त्या चिमुकलीला कसं सांगणार?
काही दिवसांनंतर, सासूबाई खोलीत आवराआवर करत असताना त्यांचा स्कार्फ बाजूला होता. अचानक काव्या तिथे आली आणि आजीला विनाकेस बघून किंचाळली, “आजी, तुझे केस कुठे गेले?” सासूबाईंनी तिला जवळ घेत समजावलं, “बाळा, मी दवाखान्यात एका राक्षसाशी लढत होते, तो पळताना माझे केस घेऊन गेला.”
काव्या अत्यंत निरागसपणे म्हणाली, “आजी रडू नकोस, तू माझे केस घे ना. मम्मा नेहमी माझे केस कापते, ते परत येतातच. तू माझे केस लावून घे.” काव्याच्या या शब्दांनी सासूबाईंचे डोळे पाणावले.
खोलीबाहेर उभ्या असलेल्या पूनमने हे ऐकलं आणि तिचं मन सुन्न झालं. तिला आठवलं, तिला स्वतःच्या लांबसडक केसांचा किती अभिमान होता. पार्लरमध्ये गेल्यावर एक इंच केस कापायला सुद्धा ती दहा वेळा विचार करायची. पण आज तिला जाणीव झाली की, सासूबाईंना त्यांच्या केसांविना कसं वाटत असेल.
दुसऱ्या दिवशी पूनम सकाळीच बाहेर पडली आणि संध्याकाळी जेव्हा घरी परतली, तेव्हा तिला बघून सासूबाई आणि तिचा पती अमित दोघेही थक्क झाले. पूनमने तिची ती लांबसडक वेणी कापून खांद्यापर्यंत केस केले होते.
अमित चिडून म्हणाला, “पूनम, हे काय केलंस तू? तुझे केस तर तुला जिवापाड प्रिय होते ना?”
पूनम शांतपणे म्हणाली, “काल काव्याच्या बोलण्याने माझे डोळे उघडले. तिला आजीचं दुःख समजलं, पण मला उशिरा कळलं. मी माझे केस ‘कॅन्सर पेशंट्स’साठी दान करून आले आहे. आपण कापलेले केस कचऱ्यात जातात, पण तेच केस चेन्नईच्या कॅन्सर सेंटरला पाठवले तर त्यातून गरजूंसाठी ‘विग’ बनवले जातात. आई, स्वतःमध्ये हा बदल करून मला खूप समाधान वाटतंय. उद्या आपण तुमच्यासाठीही एक सुंदर विग बनवून घेऊया.”
सासूबाईंना गहिवरून आलं. त्यांच्या सुनेने त्यांचं दुःख समजून घेऊन स्वतःच्या सौंदर्याचा असा त्याग केला होता, हे पाहून त्यांना पूनमचा अभिमान वाटला. अमितलाही जाणवलं की, केस कापल्यानंतर पूनम आज अधिक सुंदर दिसत होती, कारण आज तिचं मन अधिक मोठं झालं होतं.
लेखिका: सिद्धी भुरके
