मंगळसूत्र
”मंग्या, पैशांची लय नड आहे रे. काही मदत होईल का? जमतील तसे लवकरात लवकर परत करेन.”
अज्यानं आज जवळपास सातवा-आठवा फोन फिरवला होता, पण प्रत्येक ठिकाणाहून केवळ ‘नकारघंटा’च ऐकायला मिळत होती.
आईच्या पित्ताशयाचं ऑपरेशन तातडीने करायचं होतं. तिची ती जीवघेणी पोटदुखी आता त्याला बघवत नव्हती. वडिलांच्या निधनानंतर आईनं रक्ताचं पाणी करून त्याला वाढवलं होतं, संकटात खंबीरपणे साथ दिली होती. आज तिची सेवा करण्याची त्याची पाळी होती, पण नियतीने त्याचे हात जणू बांधले होते.
एकीकडे आईचं आजारपण आणि दुसरीकडे मुलांच्या शाळेची थकलेली फी. लॉकडाऊनने हातावरचं पोट असणाऱ्या अज्याचं कंबरडंच मोडलं होतं. भाजी विकून येणारा पैसा औषधांत खर्च होत होता, तर बायकोची घरकामंही सुटली होती. मजुरीची दुसरी कामंही मिळत नव्हती.
”फी भरली नाही तर मुलांना परीक्षेला बसता येणार नाही,” शाळेचा तो फोन… आणि “वेळेवर ऑपरेशन झालं नाही तर धोका वाढेल,” डॉक्टरांचे ते शब्द… त्याच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं.
एकीकडे जुनं खोड वाचवण्याची धडपड, तर दुसरीकडे उमलत्या भविष्याची चिंता. कोणा एकाचाच प्रश्न सुटण्याइतपतही त्याच्याकडे बळ नव्हतं. सुमा (बायको) काही मदत मिळते का, हे पाहायला बाहेर गेली होती. शेवटी काहीच सुचेनासं झाल्यावर तिरमिरीतच अज्या उठला. दिवाळीत मोठ्या हौसेनं केलेलं सुमाचं ‘मंगळसूत्र’ त्यानं कपाटातून बाहेर काढलं.
सोनाराच्या दुकानात जाताना पाय जड झाले होते, पण पर्याय नव्हता. पैशांची सोय झाली खरी, पण सुमा काय म्हणेल या विचारानं त्याच्या जीवाला घोर लागला. रात्री सुमानं जेवायला वाढलं. अज्यानं ताट ओढलं पण घास काही उतरेना.
”पोरं? आणि आई?” त्यानं कसनुसं विचारलं.
“झालं त्यांचं जेवण.”
“आणि तू?”
“आज वटपौर्णिमा आहे ना, माझा उपास आहे.” ती शांतपणे म्हणाली.
तिचं उत्तर ऐकून त्याच्या काळजात चर्र झालं. वटपौर्णिमेलाच आपण तिचं सौभाग्याचं लेणं विकलं? तो स्वतःलाच गुन्हेगार मानू लागला. कसं सांगायचं तिला? तो बिछान्यावर पडला तरी डोळ्याला डोळा लागेना.
”सुमे…” तो हळूच पुटपुटला.
“माहितीये मला…” सुमा गोड हसली. तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, तर एक असीम समाधान होतं.
”दुसरा काहीच पर्याय उरला नव्हता गं माझ्याकडे,” अज्याचा आवाज जड झाला.
”जाऊ दे हो… उद्या पोरं शिकून मोठी होतील, घर घेतील, मला सोन्या-नान्याने मढवतील सुद्धा. पण त्या दागिन्यांना आजच्या या मंगळसूत्रासारखा ‘मोठेपणा’ कधीच मिळणार नाही. घराच्या अब्रूसाठी आणि आईच्या जिवासाठी कामी आलं, हेच त्याचं सार्थक! आता झोपा बरं, सकाळी लवकर भाजीच्या गाडीवर जायचंय.”
आपल्या गळ्यातल्या रिकाम्या काळ्या पोतीशी हळुवार खेळत ती बोलत होती. अज्याच्या मनावरचं मणामणाचं ओझं एका क्षणात उतरलं. परिस्थितीशी दोन हात करताना दोन जीव एकमेकांचा आधार बनले होते. प्रेम आणि विश्वास अश्रू बनून दोघांच्या डोळ्यांतून सांडत होता. सुमा हळूच त्याच्या कुशीत शिरली आणि आभाळातील चंद्रही त्यांचं ते पवित्र नातं पाहून ढगाआड लपला.
लेखिका: ©️®️ दीपाली थेटे-राव
