शांततेचा पोलाद
शांततेचा पोलाद — पवार साहेबांचं न थकणारं व झुकणारं आयुष्य व नियतीचा क्रूर आघात

पवार साहेबांचं उभं आयुष्य पाहिलं, तर ते केवळ यशाची मिरवणूक नाही; ते संघर्ष, संयम, सहनशीलता आणि मौनातून घडलेलं नेतृत्व आहे. असंख्य उतार-चढावांनी भरलेलं हे आयुष्य, तरीही आतून स्थिर, शांत आणि विचारपूर्वक निर्णय घेणारं — हेच पवार साहेबांचं खरं वैशिष्ट्य आहे.
सामान्य माणसाला ज्या गोष्टी सहन करणं अशक्य वाटेल, त्या पवार साहेबांनी गप्पपणे सहन केल्या. अपमान, आरोप, राजकीय डावपेच, कौटुंबिक वादळं — प्रत्येक वेळी त्यांनी प्रतिक्रिया देण्याऐवजी परिस्थितीला सामोरं जाणं पसंत केलं. कारण त्यांच्या आयुष्यात शांतता ही कमजोरी नव्हे, तर ताकद होती.
स्वतःच्या पुतण्याला, स्वर्गीय अजितदादांना, वडिलांसारखा आधार देत राजकारणात उभं करणारा हा माणूस, जेव्हा त्याच पुतण्याने राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी वेगळी वाट धरली, तेव्हा साहेबांनी शब्दांनी नाही तर मौनाने उत्तर दिलं. कुठलाही आक्रोश नाही, कुठलीही टीका नाही — फक्त आलेल्या क्षणाला सामोरं जाण्याची तयारी. हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मोठेपण आहे.
आज अजित पवारांच्या अकाली ,अनाकलनीय ,दुर्दैवी व निःशब्द निधनामुळे पवार साहेबांवर कोसळलेला हा आघात, साहेबांना इतकं खचलेलं आजवर कधीच बघितलेलं नाही…!
कातरलेले शब्द, पाणावलेले डोळे,घोगरा आवाज, भावनांना बांध घालण्याचा अयशस्वी प्रयत्न,दादांच्या धक्कादायक निधनानंतर माध्यमांसमोर खचलेले कुटुंबप्रमुख साहेब बघतांना कुटुंबावरील आघाताची कल्पना येते. कुणाच्याही आयुष्यात येऊ नये, अशीच प्रार्थना मनातून उमटते. बारामतीकडे जाताना किंवा अपघात स्थळी जाताना दिसणारा त्यांचा निर्विकार चेहरा,
वेदना लपवणारा नसून त्यागाने स्वीकारलेला आहे.
दुःख झेलतानाही चेहऱ्यावर संयम राखणं, हे फक्त दिव्यत्व प्राप्त झालेल्यांनाच जमतं. तेच पवार साहेबांच्या आयुष्याचं गमक आहे
बारामतीचं पवार कुटुंब हे देशातील एक आगळंवेगळं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचा आधारस्तंभ म्हणजे पवार साहेब. गेली साठ वर्षे राजकारणाच्या रणभूमीवर अखंड लढणारा हा कर्मवीर, केवळ नेता नाही; छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणारा जाणता राजा …
तो पवार कुटुंबाचा ऐवज आहे, बारामतीच्या मातीचा अभिमान आहे.
खरंतर पवार साहेबांचं आयुष्य म्हणजे जगण्याचं एक तत्त्वज्ञान आहे.
दुनिया आपल्याकडून सतत काही ना काही मागत असते
कधी तडजोड,
कधी गप्प राहणं,
कधी हसणं,
तर कधी आपण आहोत त्यापेक्षा वेगळं बनणं।
दररोज माणसाला कुठल्या ना कुठल्या भूमिकेत शिरावं लागतं
चांगला मुलगा, समजूतदार मुलगी, यशस्वी माणूस, कणखर पुरुष।
या सगळ्यात खरा माणूस मात्र अनेकदा मागे पडतो.
म्हणूनच जगात राहणं जड वाटतं.
इथे जगावं लागत नाही, इथे निभावं लागतं।
पवार साहेबांनी हे निभावणं आयुष्यभर केलं.
प्रत्येक गोष्ट मनावर न घेणं,
प्रत्येक जखम दाखवणं नाही,
आणि प्रत्येक सत्य बोलणंही नाही
हे त्यांनी शिकून घेतलं.
जग आणि मनाची लढाई त्यांच्या आयुष्यात कायम सुरू राहिली.
मन म्हणालं, “थोडं थांब, थोडं जाणवू दे,”
आणि जग म्हणालं, “धाव, पुढे जा, वेळ नाही.”
या ओढाताणीत माणूस थकतो,
आणि ती थकवाही हसण्यात लपवतो.
पवार साहेबांनीही तेच केलं पण स्वतःला हरवू दिलं नाही.
जग आपल्याला हळूहळू माणसातून “सिस्टम” बनवतं.
संवेदनशीलतेला कमजोरी,
प्रामाणिकपणाला मूर्खपणा,
आणि शांततेला पराभव म्हटलं जातं.
तरीही पवार साहेबांनी आपल्या आतल्या माणसाला जपलं.
हीच त्यांची सगळ्यात मोठी लढाई होती आणि विजयही.
पोलादी पुरुषांच्या आयुष्यातही वादळं येतात.
पण त्या प्रत्येक वादळातून शांतपणे पुढे जाणारा असा माणूस
या युगात झाला नाही,
आणि होणारही नाही
कधीच नाही.
अलौकिक महात्म प्राप्त झालेल्या पवार साहेबांकडून आम्हाला एकच प्रार्थना आयुष्यभर साथ देत राहील..
तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे
हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी, साधना करिती तुझी जे नित्य तव सहवास दे
प्रा.डॉ.अशोक पिंगळे
सचिव
यशवंतराव चव्हाण सेंटर नाशिक विभाग
