राष्ट्रसेवेतून मातृत्वाकडे : एक असामान्य दत्तक कथा
काल मोठी गंमतच झाली!
एका दाम्पत्याने एक सहा महिन्यांचं बाळ दत्तक घेतलं.
हे बाळ अत्यंत वाईट अवस्थेत शिशुगृहात आलं होतं तेव्हा ते अवघ्या सहा दिवसांचं होतं!
आई नसलेलं, बाप हरवलेलं अनाथ पोर!
काट्या कुट्यात फेकून दिलेलं, व्यवस्थेने नाकारलेलं! घरच्यांनी अव्हेरलेलं!
जखमांच्या आणि आजारांच्या विळख्यात आलं होतं!
उपचारानंतर आणि शिशुगृहात घेतलेल्या प्रेमळ काळजीनंतर आज हे बाळ दत्तक म्हणून जाण्यासाठी सज्ज होतं!
आज त्याला त्याचे हक्काचे नवे “आईबाबा” मिळणार होते!
आमच्याकडे बाळाची तपासणी करून ते आता त्यांच्या गावी दिल्लीकडे रवाना होणार होते!
दत्तक जाणाऱ्या बाळाबद्दल काही महत्वाच्या वैद्यकीय सूचना आणि समुपदेशन आम्ही नेहमी करत असतो,
तेव्हा कुणाकडे बाळ जातं आहे त्यांची पालक म्हणून मानसिकता सुद्धा आम्ही बोलण्यातून तपासून पाहत असतो.
आई म्हणून बोलतांना समोर बसलेल्या तिच्यात असलेलं कमालीचं तेजस्वीपण मला सुरुवाती पासून जाणवत होतं!
दत्तक घेणारी आई लगेच बाळाला जनरली जवळ घेत नाही, ते बाळ अनाथालयाच्या सिस्टर जवळ असतं!
पण या केस मध्ये बाळ अगदी मायेने जवळ घेऊन ही नवी आई माझ्यासमोर बसलेली होती!
बोलण्याच्या ओघात कळलं की बाळाची ही आई सैन्यामध्ये मेजर पदावर नियुक्त आहे आणि आता निवृत्तीनंतर बंगलोरमध्ये सैन्य प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असणार आहे!
पुढे बोलताना अजून एक धक्का बसला!
2017 मध्ये जेव्हा तिचं लग्न सुद्धा झालेलं नव्हतं तेव्हाच तिने ठरवलं होतं की आपलं संपूर्ण जीवन आपण राष्ट्रीय संरक्षणासाठी समर्पित करायचं, आणि म्हणूनच तिने त्याच वेळी बाळ जन्माला घालण्यापेक्षा दत्तक घ्यायचं ठरवलं आणि तशी नोंदणी सुद्धा करून ठेवली!
नंतर पुढे जाऊन तिने वर्तमानपत्रात आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर जाहिरात दिली की जो या अटीवर माझ्याशी लग्न करायला तयार असेल अशा मनाने निर्मळ आणि सुशिक्षित , तरुणाशी मी लग्न करेन!
आणि झालंही तसंच
2023 मध्ये अपेक्षित मुलगा (आय टी मध्ये उच्चपदावर असलेला) मिळाला दोघांनी लग्न केलं, आणि CARA (Central Adoption Resource Authority) च्या संकेत स्थळावर आधीच करून ठेवलेल्या अधिकृत नोंदणीतून त्यांना हे बाळ मिळालं!
बाळाचं संगोपन कसं करायचं याची पूर्ण जाणीव असलेलं हे प्रगल्भ दाम्पत्य,
वयाने तसं फार मोठं नव्हतं, पण त्यांची वैचारिक परिपक्वता, देशाबद्दलचं प्रेम, अत्यंत कौतुकास्पद वाटलं !
कर्तव्यपोटी कठोर असूनही ममत्व आणि जिव्हाळ्याचा ओलावा असलेले हे आगळे वेगळे आईबाबा पहिल्यांदाच पाहायला मिळाले !
हसतमुखाने त्यांनी आमचा निरोप घेतला,
तेव्हा मागे वळून पाहणाऱ्या त्या बाळाच्या चेहऱ्यावर हसू होतं!
हे बाळ अगदी योग्य हातात गेल्याचं समाधान उरी बाळगून आम्ही पुढच्या पेशंटला तपासू लागलो!
डॉ अभिनय दरवडे
संगोपन बालरुग्णालय
