तथास्तु

श्रीवर्धनमधील सहस्रबुद्धेंचा जुना वाडा आणि दोन बहिणींच्या भावूक आठवणी

“…झोपाळा अगदी तस्सांच करकरतोय ना गं? तुला आठवतंय? बोडसांची शाल्मली खेळायला आली आपल्याकडे की ती नेहमी विचारायची, तुमचा झोपाळा नेहमी असा करकरतो. तुम्ही तेल का सोडत नाही? खरंतर अप्पा दर महिन्याला अमावस्येला वरच्या कड्यांमधे तेल सोडत. पण तरीही तो करकरे…” मी

“हो आणि अप्पा या झोपाळ्याच्या बाबतीत प्रचंड सेन्सिटिव होते माहितीये ना? हा अस्सल सागवानी झोपाळा त्यांच्या वडिलांनी म्हणजे तात्यांनी बनवून घेतला होता. विभे, किती आठवणी असतील ना गं या झोपाळ्याच्या मनात?” सुमा

आम्ही दोघी क्षणभर शांत झालो. मी विभा आणि माझी बहीण सुमा म्हणजे सुमित्रा…या क्षणी निरव शांतता होती. शांततेवर ओरखडा उमटावा तसा झोपाळा एकटाच किरकिर करत होता. आमचं श्रीवर्धनचं जुनं घर. मोठ्ठं थोरलं अंगण, उजवीकडचा जुना प्राजक्त, त्यामागचा साखऱ्या आंबा, मग एकसलग असलेल्या तीन पोफळी, तब्बल तीन पिढ्या एकाच ठिकाणी असलेली अंगणातली उखळ… इथे आम्ही श्रीवर्धनला आलो की देह वर्तमानात आणि मन भूतकाळात असतं. आमचं दोघींचंही बालपण समृद्ध होतं. अतिशय सुसंस्कृत आणि निकोप आयुष्य आम्ही जगलो…

हा आमचा सहस्रबुद्धेंचा आटोपशीर पण तसा बऱ्यापैकी मोठा वाडा, अप्पा, आई, जनुकाका, कावेरीकाकू, त्यांचा मुलगा आणि आमचा एकुलता एक चुलतभाऊ विवेक, मी मोठी विभा आणि माझ्या पाठची सुमा… शेजारी बोडसांचा वाडा, मग मारुती मंदिर त्याला लागून बर्वेंची वाडी आणि मग अफाट क्षितिजाच्या पार पसरलेला समुद्र… खुप छान होतं आमचं बालपण…. शांत आणि बरंचसं बाळबोध….

सुमाचं आणि माझं नातं अतिशय छान होतं. आजही आहे… तितकंच घट्ट…. आम्ही बहिणी बहिणी असलो तरी आमच्यात कधीच एकमेकींच्याविषयी हेवा, असूया असं कधीच नव्हते. वयात अगदी कमी अंतर असल्याने खरं म्हणजे दोन बहिणींत असणारी अलिखित स्पर्धा आमच्यात सुदैवाने कधीच नव्हती. आजही नाही…. गंमत म्हणजे आमची मतंही अनेकदा सारखीच असत. बोडसांची शाल्मली हाफमॅड आहे यावर आमचं एकमत होतं. आम्हाला दोघींनाही परसदारच्या बकुळीपेक्षा प्राजक्ताचा सुगंध जास्त आवडे. नलुमावशीने केलेली सुधारसपुरी ही जगातली एक नंबर आहे असं आम्हाला दोघींनाही वाटे…. काही बाबतीत छोटेसे मतभेद होते…. 😊 सुमाचं विवेकशी खूप पटे, माझं फार पटत नसे…. आज खूप दिवसांनी आम्ही आमच्या जुन्या घरी एकत्र बसलो होतो. आई, अप्पा, जनुकाका आणि काकु एकापाठोपाठ एक दहाबारा वर्षात गेले. विवेक आमच्यापेक्षा दोन वर्षे मोठा, तो फॅमिलीसह पुण्यात सेटल झाला. तो सीए झाला… त्याचं छान चाललंय. विवेकला एकच मुलगा, सिध्दार्थ.. तो डेन्मार्कला असतो. विवेक कित्येक वर्षात श्रीवर्धनला आलाच नाही. त्याला आमच्यासारखं गावचं वेड नाही. तो शहरात रमणारा…

सुमाचंही असावं पण माझ्या आठवणी लख्खं ताज्या आहेत. वाड्यामागची दोन एकराची वाडी, परसातलं तुळशीवृंदावन, त्यावर रेखाटलेली गोपद्मं आणि स्वस्तिकं, कोणीतरी फार पूर्वी मोडीलिपीत लिहिलेलं श्री तुलसी प्रसन्न… अप्पा दरवर्षी तुलसीविवाहाआधी तेच शब्द गिरवून रंगवत, गोठ्यातले जिवा आणि शिवा अशी बैलजोडी, दोघेही उंचपुरे आणि गरीब बैल, शांत आणि पाणी भरल्या डोळ्यांची गंगा गाय, अखंड गाईबैलांची उस्तवार करणारा मारुती नावाचा गडी, त्याचा अंगाला कायम शेणामुताचा आणि विडीचा वास येई, तो हसू लागला की ओठांच्या कडांशी थुंकी जमा होई, मग थांबून ती गिळून तो पुन्हा हसे… वाडीतली धुळकट पाऊलवाट, गगनचुंबी नारळाची झाडं.. सगळंच ठळक आठवतंय. बऱ्याच आठवणी अगदी ताज्यातवान्या असल्या तरी आठवणींचे मूळ गाभे एव्हाना कालौघात संपलेत… काही पुसट झालेत. अप्पा गेल्यापासून श्री तुलसी प्रसन्न कोणीच गिरवलं नाही, आताशा तुलसीविवाहच होत नाही. राखणीची लक्ष्मी बिचारी नेमाने पाणी घालते म्हणून तुळस बहरलेली आहे इतकंच…. काल मी आणि सुमा हातात हात घालून सबंध वाडी फिरुन आलो. सखाराम आणि लक्ष्मीने वाडी चांगली राखली आहे. आता इथे कोणीच रहात नाही म्हणून वाडी राखायची आणि त्याबद्दल सगळं उत्पन्न ठेव या बोलीवर दोघं इथे रहातात….

सुमा आणि मी देखील खूप वर्षांनी श्रीवर्धनला आलो. आयुष्यातली तब्बल २४ वर्षे एकत्र घालवून शेवटी आपापल्या लग्नानंतर आम्हां बहिणींची जी ताटातूट झाली ती खूपच जास्त आणि काहीच्या काही टोकाची… शिक्षणानिमित्त आम्ही सहा वर्षे पुण्यात राहून पुन्हा गावीच परतलो…कालांतराने वर्षभरात काहीशा अंतराने लग्न ठरली आणि मी ठाण्यात, ती पुन्हा पुण्यात गेली…. तरी भेटीगाठी होत तशा आमच्या. मग मात्र नियतीने आमच्याशी आणखीन खेळ खेळायचं ठरवलं. आधी मी २००० साली सिएटलला गेले यांच्यासोबत आणि २००३ साली ती सिडनीला… जगाच्या नकाशावर दोघी दोन टोकांना निघून गेलो. अर्थात पृथ्वी गोल असल्याने ती दोन टोकं एकीकडून लांब आणि दुसरीकडून जवळ होती तो भाग वेगळा पण आता भेटीगाठी संपल्या…

आई आणि अप्पा गेले तेव्हा कार्यापुरतं काही दिवस होतो एकत्र पण नातेवाईकांच्या धबडग्यात बोलणं झालंच नाही…. आमच्या दोघींचे जॉब, नवऱ्यांचे जॉब, मुलंबाळं यात जेमतेम एकेकदा एकमेकींच्या घरी जाता आलं. मला एक मुलगा, रोहन आणि सुमाची दोघं राहुल आणि माया… आता तिघंही कॉलेजला असतात पण एक गोष्ट आमच्या लक्षात आली आणि आम्ही दोघींनीही ती स्विकारली ती म्हणजे आमच्या मुलांचं आणि दोघींच्या नवऱ्याचं परस्परांशी अजिबात घट्ट नातं नाही. नात्यात जसे व्हॉटसअप ग्रुप असतात तसं काही नाही. मुलं दोनदा भेटली तेव्हा फक्त हाय हॅलो केलं. बोलणं औपचारिक… माझा नवरा जगदीश आणि सुमाचा श्रीराम तर वर्षावर्षात एकमेकांसमोरही आले नाहीत. मोबाईलमधे फक्त फोन नंबर आहेत बाकी काही नाही.

एकदा आम्ही याच विषयावर बोलत होतो. आपलं दोघींचं नातं जितकं घट्ट आणि जिव्हाळ्याचं आहे तितकं यांचं नाही… अर्थात तशी अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे म्हणा. भौगोलिक अंतरच इतकं जीवघेणं आहे की मनं जुळणार कशी? आणि तसं नातं आपसूकच जुळायला हवं ना? मग आता आम्ही आमच्या पन्नाशीच्या जवळपास आल्यावर मार्ग शोधला. आम्ही वर्षातून एकदा ठरवून एकत्र येतो श्रीवर्धनला… मागच्या वर्षी दिवाळी इथे साजरी केली, त्याआधी संक्रातीचं हळदीकुंकू केलं, एकदा गणपतीत इथे होतो. घरी गणपती नसला तरी गावात म्हात्रेकाका, बोडसांचा गणपती हे आमचे घरचेच गणपती होते… आता आम्ही दोघी ठरवुन एकत्र येतो. येण्याआधी सखाराम घर आवरुन ठेवतो. आम्ही एकदोन दिवस पुढेमागे येत असू तर मुंबईत हॉटेलवर उतरतो, आणि मग श्रीवर्धनहून विकासची कार मागवतो आणि येतो… आल्यावर आधी नाक्यावर बापटकाकांच्या त्रिवेणीची झणझणीत मिसळ खाल्ली की गावचा फील यायला सुरु होतो. मग बाप्पाकडची नानकटाई, चिमणकाकाच्या दुकानात जाऊन किराणा…. सगळी धमाल आम्ही पुन्हा करतो… आता आमचं येणं गावालाही नित्याचं आहे. आमच्या मुलाबाळांची आणि नवऱ्यांची मनं कधी एकत्रच आली नाहीत याची खंत आम्हाला नक्कीच आहे पण आताशा आम्ही ती बाळगत नाही. आम्हा दोघींची नाळ घट्ट जुळलेली आहे ती तशीच राहील….

परवा एअरपोर्टला कॉफी घेऊन सुमा घट्ट मिठी मारून जड पायांनी चालत निघून गेली. तिची पाठमोरी आकृती बघताना मनात विचार आला… जीवनवृक्षाची मोठी गंमत असते ना? कोकणातल्या लहानशा गावात जन्माला आलेल्या इवल्याशा वेलींचे आता मोठे वृक्ष होऊन कुठच्या कुठे वाढत होते, बहरले होते पण मुळं मात्र एकात एक गुंतून पुन्हा मूळ मातीत काही श्वास घ्यायला एकत्र येतात… ती तशीच आणखीन बरीच वर्षे येत रहाणार होती…. तथास्तु

~ सचिन मधुकर परांजपे (पालघर)

(संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.