नववर्षाला लिहीलेले एक पत्र..

अलविदा, हे वर्षा….
तुझी आता जाण्याची वेळ… एक शांतता घेऊन येणार आहे. बघ, मी जेव्हा बैठकीत आरामशीर बसून समोरच्या भिंतीकडे टक लावतो, तेव्हा अखेरच्या क्षणातील ही दिनदर्शिका शेवटचा श्वास घेताना कुणी अगदी जवळचा अंतिम इच्छा प्रकट करतो असे वाटते.
जाऊ दे…, बाहेर खिडक्यांच्या तावदानावर डिसेंबरची ही थंड हवा सळसळ करताना तुला घेऊन जाण्यासाठी कुणी थाप देत आहे, असेच फिल होतं बघ..!
असो,जरा आठव रे,जेव्हा तू आलास तेव्हा एक मस्त कोऱ्या करकरीत कॅनव्हासवर आवडत्याचे मनोभाव,आशा-आकांक्षांचे रंग घेऊन आला होतास. आता जर्जर असताना तुझ्या प्रत्येक सुरकुतीवर एक कथा, सुरकुतीच्या हरघडीवर एक सल, सुरकुतीने पडलेल्या रेषेत त्या हरेक क्षणांचा टाहो दिसतो. असं पाहताना आता तू एक फक्त वर्ष नाही उरला,तू म्हणजे माझ्या जीवात एक युग होऊन उरलेला आहेस.
आज वर्षीची तुझी सुरुवात अशीच मस्त, थंडगार, आल्हाददायक, एक आशेचा किरण, ऊब घेऊन येताना त्या चोवीसच्या अडचणी निभावण्याची एक ताकद व एक अनाहूत शक्ती माझं संरक्षण करताना हृदयी उर्मी जागी होईल असंच वाटलं. जेव्हा तू तुझा वसंत घेऊन आलास तेव्हाही हीच अपेक्षा होती. जीवन सुखमय होताना समाधानाच्या नवनवीन आशा सतत हसतमुख समोर औक्षण करतील. परंतु हे कलियुगीन स्वभावी वागण्याचे जेन-झी कर्तृत्व व आमची सांस्कृतिक पारंपरिक शैली यात झालेली तफावत आयुष्याच्या या वासंतिक चौरस्त्यात संभ्रमीच राहिली. पण तू एक मात्र चांगलंच शिकवून गेलास की, ऋतू बदलल्याने नशीब बदलत नसतं.
आणि हो तो तुझा उन्हाळा.. ओऽह…! आमच्यातील ती बैचेनी, निराशा, विनाकारणी अपेक्षा होती. यावर तर तू स्वतः घणांनी असे घाव करत परीक्षा घेताना असे जाणवले की तू एवढा कस लावताना आमची एक छानशी मूर्ती करतो की काय? या तुझ्या अशा वागण्याच्या प्रकारात इतक्यांदा तुटलो गेलो.. कितीदा तरी इतके तरल स्वभावी झालो की घामांचा हरेक थेंब न थेंब हळुवार धरतीत मिसळताना.. आमचेही धैर्य गळून पडते की काय हीच भावना कायम राहत होती.
मग आला तुझा तो पावसाळा… असं वाटलं, आमच्या या धैर्याचे अश्रूच टपटप पडावेत बघ, असं झालं होतं. हिरवीगार रानं सुद्धा तपकिरी करताना एका कठोर शिक्षकाचे रूप तू घेतले होतेस. उरलेसुरले पाण्याचे छतावरील थेंब परत-परत सुखाच्या आठवणी देत होते. या वेळी आम्हांस जाणीव झाली की, तू आमच्या आतच बरसतो आहेस… एकतर बाहेर घरं, वृक्ष, पेरलेलं रान वाहून घेऊन जाताना आमच्यातील आतलं धैर्यसुद्धा वाहून जातंय की काय..? हीच भावना मनोमन चिंतन करताना तू शिकवलंस की, मजबूतच्या मजबूत मोठमोठी धरणं सुद्धा कधी-कधी अशा भावनांच्या प्रवाहात वाहून जातात.
हे दोन हजार पंचवीसा, तू आम्हांला त्या भावनांच्या रिकाम्या खुर्च्या रिकाम्याच राहू शकतात हे दाखवून दिलंस. काही फोन यादीतील संपर्क (कॉन्टॅक्ट लिस्ट) आता डिजिटल समाधीच असतात. जानेवारीच्या कितीतरी आशा-अपेक्षांचे ध्वनी तू पूर्ण केलेस, कितीतरी ते डिसेंबर येईपर्यंत आमच्याच शांततेच्या ब्रह्मांडांत वातावरणी तसेच फिरते ठेवलेस… बाकी ठेवलेस..! आणि हळूवार शिकवत गेलास की शांतता हेच सर्वस्व आहे.
तुझ्या या बारमाही प्रवाहात मी पाहिलंय, कित्येक खोटी-नाटी रूपं बिनधास्त वेगात असतात… त्याच वेळेस सचोटी आणि खरेपणा केवळ रांगत-रांगत… कसेतरी आपापल्या ध्येयाकडे धडपडत जाण्याचे कठोर यत्न करतात. तू हेही नकळत शिकवलंस की मुखवटे सुंदर असतात, पण तेच मुखवट्यामागील चेहरे भयानक असतात. आणि दर दिवशी एक-एक पान उलगडलीस कधी समाजाची… कधी मित्रांची… कधी नात्यांची… कधी-कधी अगदी माझ्या स्वतःचीच..!
असो, आता तू तुझ्या शेवटच्या काही घटकांमध्ये येऊन पोहोचला आहेस, एक अनाहूत कोलाहल होत आहे बघ! कधी-कधी वाटतं तुला द्यावं ढकलून या काळाच्या पडद्याआड आणि संपवावी ही जगण्याची धडपड… पण… पण परंतु तूच, तूच तो ज्याने माझ्या आयुष्याचे एक वर्ष घेतले आहेस ना? अरे असू दे, वाटतं खूप काही शिकवलंस… आज बघ हे कलियुग आहे रे, एवढं कडक राहून आज या स्थितीत कोण शिकवणार रे? किती कठोरतेने चांगुलपणा दिलास? किती मोठ्या मनाने समाधान काय असतं याची व्याख्या सांगितलीस… असो, या माझ्या जीवनाच्या उपनिषदाचा शेवटी तूही एक अध्यायच!
हो, जाच आता तू, मीच तुला माफ करतोय बघ. त्या तमाम अर्ध्या राहिलेल्या इच्छांसाठी, त्या ओठातच राहिलेल्या शब्दांसाठी, त्या पापण्यांवरच राहून परत गेलेल्या स्वप्नांसाठी… हो, परत एकदा माफ करतो तुला की तू केवळ एक वेळ आहेस म्हणून आणि वेळेचं कर्म आहे येणं आणि निघून जाणं… वेळ थोडेच कुणास घाव देते? कधी ती एखाद्यावर येते तेव्हा त्याच क्षणी ती दुसरे कुठेतरी कुणाला आनंदही देत असते… आम्हीच ते बापुडे असतो जे वेळेवर सगळे ढकलून देतो. असो, हे वर्षा तू केवळ वाहता आहेस…या प्रवाहात आमची आयुष्याची गलबतं आम्हीच खंबीरपणे रोवायची असतात… चल जाऊ दे… तूच आनंदी राहा या काळाच्या पडद्याआड..! आणि जा त्या इतिहासाच्या कुंडीत पड… संग्रहालयात छानसं बाळसं घे.. तू येऊन गेलास आणि परत येणार नाहीस हे लक्षात घे, आता आराम कर.!!
जरी तुझी मला आता गरज नसली तरीही मी आता मात्र अगदी तयार आहे… आनंदाने, समाधानाने या येणाऱ्याचं स्वागत करायला.. माझ्याजवळ परत सव्वीस लालचुटूक गुलाबांचा बुके तयार आहे… नवीन वर्षाचं स्वागत करायला..!!!
@दीपा..!!!
दीपक मारोतीराव पाठक हे व्यवसायाने अभियंता असून शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत. १९८२ सालापासून त्यांच्या लेखणीतून उमटलेले विविध लेख दैनिकांमधून प्रसिद्ध झाले आहेत. जिल्हास्तरीय कवी संमेलनातील सहभाग आणि वाङ्मयीन नियतकालिके तसेच दिवाळी अंकांमधील सक्रिय लेखनाद्वारे त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
संपर्क: ८०१०५९९०३०
