हिवाळ्यातील ‘सुपरफूड’ आणि आरोग्याची गोडी: तीळ-गूळ
डिसेंबर-जानेवारीतील गुलाबी थंडी आपल्यासोबत सणांची उब घेऊन येते. आयुर्वेद सांगते की, या काळात शरीराला उष्णता आणि स्निग्धतेची गरज असते. म्हणूनच आपल्या संस्कृतीत मकरसंक्रांतीच्या निमित्ताने तिळाच्या पदार्थांना विशेष महत्त्व दिले आहे.
तिळाचे आरोग्यादायी फायदे:
- कॅल्शिअमचा खजिना: हाडांच्या मजबुतीसाठी तिळातून भरपूर कॅल्शिअम मिळते.
- हृदयविकारांपासून संरक्षण: यातील ‘ऑलेथिक ऍसिड’ वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे आरोग्य जपते.
- त्वचेसाठी पूरक: तिळातील ई-जीवनसत्व (Vitamin E) थंडीत त्वचेची चमक टिकवून ठेवते.
- वजन वाढवण्यासाठी: ज्यांना निरोगी पद्धतीने वजन वाढवायचे आहे, त्यांच्यासाठी हे लाडू उत्तम आहार आहेत.
१. पारंपारिक तिळाचे लाडू (खमंग रेसिपी)

साहित्य:
- अर्धा किलो तीळ आणि अर्धा किलो गूळ
- अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी डाळं, अर्धी वाटी सुके खोबरे (किसलेले)
कृती: १. तिळाची भाजणी: तीळ मध्यम आचेवर खमंग भाजून घ्या. तीळ नीट भाजले की नाही हे ओळखण्याची ट्रिक म्हणजे—दाताखाली चावल्यावर ‘टचकन’ आवाज येतो आणि ते थोडे फुगीर दिसतात. २. मिश्रण: शेंगदाणे भाजून साले काढून कूट करून घ्या. भाजलेले तीळ, शेंगदाण्याचा कूट, डाळं आणि खोबरे एकत्र करा. ३. गुळाचा पाक: एका पातेल्यात गूळ विरघळवून त्याचा पाक तयार करा. वाटीत पाणी घेऊन त्यात पाकाचा थेंब टाका; जर गोळी झाली आणि ताटावर टाकल्यावर आवाज आला, तर पाक तयार आहे. ४. लाडू वळणे: पाकात तिळाचे मिश्रण घालून चांगले ढवळा. मिश्रण कोमट असतानाच हाताला थोडे तूप लावून गोल गरगरीत लाडू वळा.
२. खास गुळाची पोळी (खुसखुशीत आणि पौष्टिक)

साहित्य: अर्धा किलो गूळ, १०० ग्राम तीळ, २ चमचे भाजलेले चण्याचे पीठ, वेलची पावडर, दाण्याचा कूट, खसखस आणि सुके खोबरे.
कृती:
- सारण: कुकरमध्ये गूळ वाफवून (३ शिट्ट्या) मऊ करून घ्या. त्यात भाजलेला सर्व मसाला (तीळ, दाण्याचा कूट, खसखस इ.) घालून एकजीव गोळा मळून घ्या.
- पोळी: कणिक आणि थोडा मैदा एकत्र भिजवून घ्या. दोन लहान लाट्यांच्या मध्ये गुळाचे सारण भरून तांदळाच्या पिठीवर पातळ पोळी लाटा.
- सर्व्हिंग: तव्यावर खरपूस भाजून साजूक तुपासोबत गरम गरम सर्व्ह करा.
– सौ. रश्मी उ. मावळंकर
(संकलन: टीम स्पंदन, साभार: लेखक/कवी)
