कल्की 2898 AD

आपल्याकडे राजामौली या माणसाने ‘बाहुबली’च्या माध्यमातून एक बेंचमार्क सेट करून ठेवला आहे. यामुळेच भारतात प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक हीस्टोरीकल एपिकची तुलना कायम त्याच्याशी केली जाते. अर्थात बाहुबली हा चित्रपट पूर्णतः काल्पनिक आहे हे माहीत असूनसुद्धा आपले प्रेक्षक असं का करतात? हा प्रश्न मला सतत पडायचा. नुकताच प्रदर्शित झालेला नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की 2898 एडी’ पाहण्यात आला आणि नेमकं राजामौली यांच्याकडे असं काय आहे जे इतरांकडे नाही याचं उत्तर मिळालं. ते म्हणजे त्यांच्याकडे असलेलं स्टोरीटेलिंगचं स्किल.

अर्थात गेल्यावर्षी आलेल्या ‘आदिपुरुष’ नामक भयंकर प्रकारापेक्षा ‘कल्की 2898 एडी’ हा कित्येकपटीने सरस आणि उत्तम आहे. पण तरी या चित्रपटात ‘बाहुबली’ने सेट केलेला बेंचमार्क मोडायची कुवत असूनसुद्धा हा चित्रपट ते करू शकत नाही याची खंत वाटते. याला सर्वस्वी कारणीभूत आहे ते म्हणजे नाग अश्विन यांची पटकथेवर असलेली सुमार पकड. खरंतर ६००० वर्षांनंतरचं कुरुक्षेत्र, dystopian world, एकूणच सर्वत्र पसरलेला अंधकार, कलियुगाची चरमसीमा, सर्वत्र दिसणारा अन्याय, सुप्रीम यास्कीन नामक एका २०० वर्षांच्या राक्षसाचा संपूर्ण विश्वावर असलेला कंट्रोल. महाभारताचे रेफरन्स आणि काही त्याच्याशी निगडीत महत्त्वाचे सीन्स हे सगळं रेखाटण्यात नाग अश्विन यांना यश आलं आहे. किंबहुना ते आपल्याला त्या विश्वात घेऊन जातात खरे. पण फर्स्ट हाल्फमध्येच पटकथा इतकी रेंगाळते की प्रेक्षकांचं गांभीर्य काही वेळापुरतं निघून जातं. प्रभासची स्टार इमेज पाहता त्याच्या पात्राला विनाकारण विनोदी करणं, केवळ बिकिनी सीन दाखवण्यासाठी दिशा पटानीचा आणि त्याबरोबर एका गाण्याचा केलेला समावेश हे अक्षरशः बालिश आणि थुकरट वाटतं.

अर्थात या दोन गोष्टी सोडल्या तर एकूणच कथेचा बॅकड्रॉप सेट करण्यात आणि एकूणच कथा पुढे नेण्यात नाग अश्विन यांना यश मिळालं आहे. या जोडीला जबरदस्त व्हीएफएक्सने एक वेगळाच माहोल क्रिएट केला आहे. हो पण हा चित्रपट ३डी मध्ये काढायचा काही एक अर्थ नाही. २डी मध्येसुद्धा या व्हीएफएक्सचा पुरेपूर आनंद आपल्याला घेता येतो. कलियुगाचा अंत, देवाला जन्म देणाऱ्या आईच्या सुरक्षेसाठी अश्वत्थामाचं प्रकट होणं, भगवान श्रीकृष्ण यांचा यामध्ये असलेला मोलाचा वाटाआणि या सगळ्याच्या मागे असलेले महाभारताच्या युद्धाचे संदर्भ हे काहीच्या काही भन्नाट पद्धतीने सादर केले आहेत जे पाहताना अक्षरशः अंगावर काटा येतो. खासकरून सेकंड हाल्फमधली शेवटची ४० मिनिटं आपण अक्षरशः खुर्चीला खिळून राहून ते ग्रँज्यूअर अनुभवतो.

हा चित्रपट प्रभासचा असला तरी तो याचा मुख्य नायक नाही हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावर समजतं. सिनेमाचा मुख्य नायक आहे तो अश्वत्थामा, जी भूमिका साकारलीये महानायक अमिताभ बच्चन यांनी आणि अक्षरशः हा चित्रपट त्यांनी एकाअर्थी त्यांच्याच खांद्यावर उचलून धरला आहे. ‘अश्वत्थामा’च्या बाबतीत आपण जे काही ऐकलंय अगदी तसंच बिग बी यांना नाग अश्विनने सादर केलं आहे. ८० वर्षांच्या बिग बी यांना या रूपात बघण ही एक वेगळीच पर्वणी आहे. प्रभासचं पात्र ‘भैरवा’बरोबरचे अश्वत्थामाचे काही अॅक्शन सेट पिसेस तर अचंबित करणारेच आहेत. बिग बी यांना महानयाक का म्हणतात ते तुम्हाला त्यांची ही भूमिका पाहून नक्की जाणवेल. बाकी चित्रपटात कमल हासन यांची भूमिकाही महत्त्वाची आहे. याच्या पुढील भागात कमल हासन यांचं पात्र अधिक पाहायला मिळेल, पण यामध्येसुद्धा त्यांनी साकारलेला सुप्रीम यास्कीन केवळ दोनदाच स्क्रीनवर दिसला असला तरी तो तुमची झोप उडवणारा असाच आहे. चित्रपटात इतरही काही धमाकेदार आणि अनपेक्षित असे कॅमिओ आहेत. इतर कलाकारांची कामंही लाजवाब झाली आहेत.

संतोष नारायणन यांची गाणी सहज विसरावीत अशीच आहे. बॅकग्राऊंड स्कोअर काही ठिकाणी उठावदार आहे तर काही ठिकाणी विचित्र वाटतो. चित्रपट हा हिंदू पुराणातील कथांवर जरी बेतलेला असला तरी व्हीएफएक्स आणि काही तंत्रज्ञांच्या बाबतीत ‘स्टार वॉर्स’, ‘ड्यून’सारख्या हॉलिवूडपटांमधून बऱ्याच गोष्टी अगदी रीतसर ढापण्यात आल्या आहेत. ज्यांनी हॉलिवूडमधले असे चित्रपट आणि सीरिज कोळून प्यायले आहेत त्यांना या गोष्टी अगदी चटकन समजतील. व्हिज्युअल्स, स्पेशल इफेक्टच्या बाबतीत नाग अश्विन यांचं काम सफाईदार आहे, पण स्टोरी टेलिंग आणि खासकरून पटकथेवर योग्य पकड ठेवणं हे त्यांना अजून तितकंस जमलेलं नाहीये. खासकरून अशा हीस्टोरीकल एपिक्सच्या बाबतीत हीच गोष्ट महत्त्वाची असते.

आपल्या हिंदू पुराणातील गोष्टी सादर करण्यात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा हात धरणं निव्वळ अशक्य आहे हे या निमित्ताने पुन्हा सिद्ध झालं आहे. बाकी आपले हिंदी आणि मराठी दिग्दर्शक ‘टुकार हॉरर कॉमेडी युनिव्हर्स’ आणि ‘बालिश स्पाय युनिव्हर्स’ काढण्यातच धन्यता मानतात आणि जेव्हा ‘आदिपुरुष’सारखं त्यांच्या हातात काही येतं तेव्हा त्याचं अक्षरशः हसं बनवून टाकतात हे पुन्हा अधोरेखित झालंय. असो यांच्याकडून फार अपेक्षा करण्यात अर्थ नाही, सरड्याची धाव कुंपणापर्यंतच! नाग अश्विन यांच्या या ‘कल्की सिनेमॅटीक युनिव्हर्स’च्या पुढच्या भागात नेमकं पुढे काय पाहायला मिळणार यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. चित्रपट एकदा नक्कीच पाहण्यासारखा आहे आणि हो मोठ्या पडद्यावरच पहा पण २डी मध्ये, उगाच खर्च करून ३डी मध्ये पाहण्यात काहीच अर्थ नाहीये, पण एकदातरी हा सिनेमा जरूर पहाच.

© – अखिलेश विवेक नेरलेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.