प्रेमाच्या पोळ्या

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची हेमंत शिबिरे आणि या शिबिरांत मुक्कामी येणाऱ्या बाल वा तरुण स्वयंसेवकांसाठी घरोघरीच्या माउलींनी विलक्षण प्रेमाने करून दिलेल्या पोळ्या हे एक अद्भुत कालातीत अमृततुल्य रसायन असतं, आहे मंडळी…
गेल्या आठवड्यात मी राहतो तिथं पुण्यातल्या तळजाई परिसरातल्या संघशाखेतून पोळ्यांचा निरोप आला,
आणि काल सकाळी Gargiने करून दिलेल्या पोळ्या द्यायला तिथं पोचलो , सकाळच्या गडबडीत सुद्धा तिथं पोळ्या द्यायला धावतपळत आलेल्या माता-भगिनी पाहिल्या, त्यांनी प्रेमाने आणून दिलेल्या पोळ्या तितक्याच प्रेमाने एकत्र जमा करताना तिथले संघ स्वयंसेवक पाहिले आणि आठवणींचा हा पंडोरा उघडला…
देशभरात सध्या संघाची हेमंत शिबिरं सुरु आहेत. बाहेर थंडीचा कडाका असतो आणि त्यात एखादं मैदान बघून तिथं उभारलेल्या कापडी राहुट्यांमध्ये हे साधारणपणे तीन दिवसांचं निवासी शिबीर होत असतं.
जबऱ्या म्हणजे जबऱ्या मजा असते या शिबिराचा अनुभव म्हणजे. संघ स्वयंसेवक म्हणून माझ्या गेल्या जवळपास पंचेचाळीस वर्षांच्या आयुष्यात अशी अनेक हेमंत शिबिरं मी मुंबईत बाल असताना अनुभवली आहेत….
विशेषतः डिसेंबर महिन्याची कडाक्याची थंडी, त्यात साधारण तीसेक स्वयंसेवक राहतील अश्या कापडी राहुट्या, पहाटे पावणे पाचला उठणे, सगळं आवरून राहुटयांबाहेर उभं राहून प्रात:स्मरण म्हणून नंतर पितळी बादलीतून येणारा गरमागरम चहा पिऊन दंड घेऊन संघस्थानावर जाणे, सकाळचं शारीरिक करून राहुट्यांत परतल्यावर कडकडून मस्त भूक लागली असल्याने बाहेर आलेली पोहे, हरभरे उसळ, उप्पीट, फोडणीचा भात वा साबुदाणा खिचडी वा अन्य काहीही गरमागरम न्याहारी मटकावणे, नंतर स्नानादी कर्म करून पाठांतर, मग राहुट्यांमध्ये होणाऱ्या गणश: चर्चा मग भोजन मग सक्तीची विश्रांती, मग उठून परत पाठांतर किंवा अनेकानेक राष्ट्रीय विषयांवर चर्चा, मग अनेक महत्वाच्या विषयांवर संघाच्या अधिकाऱ्यांकडून बौद्धिक मग परत चहा पिऊन संघाचा गणवेश घालून सायंकाळचे संघस्थान मग रात्रीचे भोजन मग रात्रीचा सांस्कृतिक वा माहितीपर कार्यक्रम आणि दहाला दीपनिर्वाण आणि झोपाझोप….असा एकूण भरगच्च जबऱ्या रोमांचकारी कार्यक्रम या शिबिरांचा
तर मंडळी या शिबिरांत सकाळच्या चहापासून ते संध्याकाळच्या भोजनापर्यंत बाकी सर्व विलक्षण चविष्ट स्वयंपाक इथं उभारलेल्या भटारखान्यात पाकनिपुण स्वयंसेवकांकडूनच केला जातो,
….पण मला आठवतंय तेव्हापासून दोन्ही भोजनातल्या पोळ्या मात्र घरोघरी मातृशक्तीने करून दिलेल्या आणि स्वयंसेवकांनी जमा करून आणलेल्याच असतात….ठरवून मुद्दामून बहुधा
जिथं हे शिबीर असेल त्या गावातल्या वा शहरातल्या घरोघरी “संघाचं शिबीर आहे, अमुक अमुक दिवशी सकाळी वा संध्याकाळी इतक्या इतक्या पोळ्या पाहिजे आहेत” असा नेमस्त निरोप दिला जातो.
थंडीच्या कडाक्यात भरगच्च शारीरिक दमणूक झाल्याने सपाटून भूक लागणाऱ्या या शिबिरांत साधारणपणे पाचेकशे शिबिरार्थी स्वयंसेवक असतील तर व्यवस्थेतील अजून शंभरेक स्वयंसेवक धरून एकूण सहाशेएक स्वयंसेवकांसाठी साधारण एका वेळेस अडीच हजार पोळ्या घरोघरून गोळ्या केल्या जातात.
या अश्या ‘पोळ्या हव्यात’ या निरोपापासून ते प्रत्यक्ष पोळ्या ताटात वाढल्या गेल्यावर त्या पोळ्या भोजन मंडपात जमिनीवर मांडी घालून बसून खाणं हा सगळाच एक परमोद्भुत सोहळा असतो मंडळी…झपाटून टाकणारा स्वर्गीय सोहळा
पहाटे पावणेपाच पासून उठलेल्या स्वयंसेवकांचा शिबिरातला भरगच्च असा शारीरिक आणि बौद्धिक कार्यक्रम, न्याहारी सोडली तर अधे मध्ये काहीही खायला न मिळणं आणि निष्णात आचारी असलेल्या संघ स्वयंसेवकांनीच केलेलं विलक्षण स्वादिष्ट गरमागरम भोजन यामुळे या शिबिरांत जेवण जरा दोन काय चार घास जास्तचं जातं आणि छान पचत सुद्धा हा माझा अनुभव.
जितक्या जमतील तितक्या पोळ्या देण्याचा निरोप संघाच्या प्रसिद्ध अश्या निरोप पोहोचवण्याच्या रचनेमार्फत शिबीर असेल त्या शहरात शाखाशाखांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचतो.
आणि मला आठवतंय असा निरोप आल्या आल्या माझ्या आईचेच नव्हे तर माझ्या बिल्डिंग मधल्या घरोघरच्या सर्व मातांचे डोळे कायमचं “शिबिरासाठी पोळ्या द्यायच्यात” या कल्पनेनेच लकाकायचे.
हे डोळे का लकाकतात ते मी जेव्हा शिबिरार्थी म्हणून शिबिरात असायचो तेव्हा मला समजायचं.
दमून भागून भुकेने कडकडलेल्या अवस्थेत आपली ताट वाटी घेऊन जमिनीवर पंगतीत संघाची ती खाकी हाफपॅन्ट घालून बसलं आणि भाजी, आमटी, चटणी आणि ताक वाढून झालं की ताटात यायच्या त्या या घरोघरून स्वयंसेवकांनी जमा केलेल्या या स्वर्गीय पोळ्या.
आपल्या ताटात आलेल्या पोळ्या एकाच घरून आलेल्या असतातच असं नसतं कारण आलेल्या सर्व पोळ्या शिबिरात एकत्र करून मग भोजन मंडपात वाढायला पाठवल्या जातात.
खरं सांगतो मंडळी जर वेगवेगळ्या घरच्या पोळ्या आल्या ना ताटात तर मी जाम खुश व्हायचो लहानपणी. भुकेने कडकडलेल्या अवस्थेत ते जेवण एकतर स्वर्गीय लागतं आणि त्यात घरोघरी माऊलीने दांडग्या उत्साहाने करुन दिलेल्या या पोळ्या सोबतच्या गुंडाळून आलेल्या प्रेमामुळे असामान्यच लागायच्या.
पोळ्या हव्यात असा शाखेचा निरोप संघाच्या नेहमीच्या शिस्तप्रिय नियोजनानुसार आठवडाभर आधीच यायचा.
आणि मग इथूनच घरची माउली उत्साहाने कामाला लागायची. रोजच्या धबडग्यात विसरायला नको म्हणून हा निरोप नीट कॅलेंडरवर टिपून ठेवायची. शिबिरातले लहानगे स्वयंसेवक खाणार माझ्या हातच्या पोळ्या म्हणून मग माउली त्या दिवशी जरा कणिक जास्त निगुतीने आणि प्रेमाने मळायची, काहीही झालं तरी पोळ्या जराही करपणार नाहीत अशी काळजी घ्यायची, करपलीच एखादी तर बाजूला काढून ठेवायची, सकाळी केलेल्या पोळ्या पोरं दुपारी खाणार म्हणून पोळ्या छान मऊसूत राहण्यासाठी तेलाचा जास्तीचा चमचा फिरवायची, पोळ्या झाल्यावर प्रत्येक गरम पोळीवर छान पातळ केलेलं तूप लावायची हळुवार हाताने जणू काही तीच वाढणारे पोळ्या स्वयंसेवकांच्या ताटात गरमागरम अश्या प्रेमाने, नुसत्याचं पोळ्या कश्या देणार म्हणून आत शेंगदाणा चटणी किंवा तूपगूळ किंवा तूपसाखर किंवा लोणचं ठेवायची आणि या निरातिशय प्रेमाने केलेल्या पोळ्या गोळा करण्यासाठी घरी आलेल्या स्वयंसेवकाच्या हातात विलक्षण समाधानाने ठेवायची किंवा जिथं नेऊन द्यायचा असा निरोप आला असेल तिथं धावतपळत नेऊन पोचवायची.
या पोळ्या गोळा करायला जाणं हा देखील जबऱ्या अनुभव असायचा बाल असताना माझा कारण प्रत्येक घरी प्रेमाने पोळ्या गोळा करणाऱ्या स्वयंसेवकांचं तोंड सुद्धा ती घरची माउली प्रेमाने गोड करायची…काही ना काही हातावर देऊन
आणि हे सगळं पोळ्यातून आलेलं प्रेम आम्ही देशभरातल्या हजारो शाखांतले लाखो स्वयंसेवक तिथं शिबिरांत तितक्याच प्रेमाने खायचो, एकेका माऊलीच्या हातच्या त्या निगुतीने केलेल्या आणि त्यातल्या त्या चटण्या, तूप गुळाचा , साखरेचा अद्भुत गंध लागलेल्या या दैवी चवीच्या पोळ्या…
काय सांगू महाराजा ,
त्या वेळी तिथं एका आईने ममतेने पाठवलेल्या त्या पोळ्या दुसऱ्या आईच्या मांडीवर, त्या मातीत बसून खाण्याचं समाधान इथं नाही सांगता येणार ते फक्त अनुभवावंच लागेल ब्बास मंडळी
‘दहा पोळ्या द्या’ असा निरोप असा निरोप आलेला असतानाही माउली ‘असू देत जरा जास्तीच्या’ म्हणून दोन पोळ्या जास्तीच ठेवायची आणि मग अडीच हजार पोळ्या हव्या असताना तीनेक हजार पोळ्या जमा व्हायच्या.
मग काय मस्त बारीक चुरा करून झक्कास फोडणी दिलेल्या या पोळ्या दुसऱ्या दिवशी न्याहारीत यायच्या…आणि अधे मध्ये दाताखाली यायची तूपगूळ किंवा तूपसाखरेची चव…माउलीने प्रेमाने पोळीसोबत धाडलेलं
आणि हा पोळीचा विलक्षण चविष्ट चुरा खाताना कुठल्यातरी शेजारच्या राहुटीतल्या गणात मोठ्याने म्हटलेलं संघाचं पद्य नेमकं कानावर पडायचं…
“शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार है ,
दिव्य ऐसे प्रेम में ईश्वर स्वयं साकार है।…..”
चांगभलं
मिलिंद वेर्लेकर
