जिन्दगी की लौ ऊंची कर चलो…

द्रविड आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये उगवला तेव्हा सचिन थोडाच वर आला होता. खरंतर हे सगळे समकालीन. द्रविड, सचिन, गांगुली..

द्रविडला दुर्दैवाने एफ एम सी जी जगताने तेंडुलकर इज पासे द्रविड इज दी न्यू पोस्टर बॉय असं करण्याचा प्रयत्न केलेला. तो काळ म्हणजे नव्वदीच्या शेवटच्या काही वर्षांपासून ते मिलेनियम मध्ये काही वर्ष… यात भारतीय क्रिकेटपटू आणि जाहिरात क्षेत्र यांचं नातं peak ला पोचलेलं. क्रिकेट बाहेर सुद्धा या खेळाडूंच्या प्रतिमा आणि एक स्टोरी जपण्याचं काम जाहिरात विश्व करत होतं.

सुदैवाने द्रविड त्याच्या अंगभूत शांत वृत्तीमुळे या सापळ्यात अडकला नाही. ना सचिन. द्रविड सचिन rivalry कधी फोफावली नाही. द्रविडला आक्रमक खेळताना बघितलेलं आहे याचा आनंद आहे. त्या नंतर त्याला दी वॉल अवतार धारण करायला लागला. पण म्हणून त्याची लोकप्रियता कमी झाली असं नाही. द्रविड वर मरणाऱ्या कित्येक मुली आता पन्नाशीत असतील. आणि द्रविड त्यांचा heart throb वगैरे नसून एक आदर्श नवरा अजूनही असेल असं वाटतं. द्रविड क्रिकेट मधला संजीव कुमार आहे.

द्रविड कोच झाला हे मला वैयक्तिक फार आवडलं नव्हतं. त्याची ती शांत, सोज्वळ प्रतिमा. आणि आताच्या भारतीय क्रिकेट मधले टगे. म्हणजे मला अजूनही रिषभ पंत हा प्लेअर आहे असं वाटत नाही. के एल राहुल यास पाहून सुनील अण्णा बद्दल वाईट वाटतं. कोहली आणि रोहित. बास. या वयात अजून डोक्याला ताण द्यावा वाटत नाही.

त्यात टीम कोच हा जाम थँकलेस जॉब असतो. टीम हरली की कोच कोण आहे याची चौकशी आपण करायला लागतो. प्लेअर फेल झालं तर त्याचा बॅड पॅच असतो. त्याची बाजू मांडणारे फॅन्स असतात. साला कोच कडे काही नसतं. म्हणून वाटलेलं की कुठे हा जंटलमॅन या झंझट मध्ये पडतोय…

काल आपण जिंकलो. हर्षोल्हास इत्यादी झाला. हार्दिकला रडताना बघून जाम माया वाटली. रोहितला मनात उचलून घेतलं. सूर्याला कडक जप्पी मारली. बुमराहला आशीर्वाद दिले…

मग मागून संथ चालत येणाऱ्या द्रविडला बघितलं.

वर्ल्डकप…

द्रविडचा.

राहुल द्रविडचा.

लक्षात आलं वयाच्या एकावनाव्या वर्षी द्रविडने कप उचलला आहे.

फक्त वेल डीझर्व्हड इतकंच म्हणता आलं. खुप काही लिहावं वाटलं… पण लिख कर उसे बरबाद करना नहीं चाहता जो खुबसुरती उस वक्त महसुस कर रहा था…

जिन्दगी की लौ ऊंची कर चलो…

राहुल द्रविड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.