वपुंची जादू

मला नेहमी व.पुं.चे कौतुक वाटते. अहो, कारण पण तसंच आहे ना. बघा, तुमच्या मनात जे विचार येतात ते कागदावर उतरवणे सोपे असते पण ते विचार वाचून आपण देखील विचार करायला लागणं, अशा पद्धतीचे लिखाण करणे, ही कला फक्त व.पुं.कडेच आहे. कारण, विचार हे तुमच्या मनाचं प्रतिनिधित्व करतात.
आता आयुष्य म्हटलं म्हणजे चढ उतार हे आलेच. पण यात तुमच्या मनात येणारे विचार तुमच्यावर हुकूमत गाजवतात हे नक्की. समजा, तुम्ही व.पुं.चा, “शिकलेलं काही वाया जात नाही..” हा विचार वाचला तर म्हणाल, हो, बरोबर आहे पण हा विचार आयुष्य जगण्यासाठी किती महत्वाचा आहे हे ते जगताना कळतं. कारण, वेळ ही कधीच सांगून येत नाही. बघा ना, सहजीवनात समजा, नवऱ्याची काही कारणास्तव किंवा आजारपणामुळे नोकरी सुटली आणि बायकोच्या जर गाण्याच्या परीक्षा झाल्या असतील तर ते शिक्षण उदरनिर्वाहासाठी उपयोगी पडते. मग मला सांगा, व.पुं.नी बरोबर म्हटलं आहे ना!! किंवा, आयुष्यात जर तुम्ही माणूस ओळखायला चुकला असाल तर ती लागलेली ठेच तुम्हाला शिकवते, थांब, पटकन विश्वास ठेवू नकोस.. हा अनुभव तर कधीच वाया जात नाही..
बघा, प्रवास करताना तो हसत खेळत व्हायला हवा असे प्रत्येकाला वाटते, मग तो आयुष्याचा असो किंवा जिथे तुम्हाला पोहोचायचे आहे तिथला असो. या प्रवासात जर एखाद्या व्यक्तीसोबत तुमची वैचारिक देवाणघेवाण झाली तर त्या प्रवासात खूप काही गाठीशी येते. पण या साठी असावी लागते ती म्हणजे वैचारिक भूक. जसं इथे व.पुं.नी म्हटलं आहे, ” कायम विचारांची भूक असलेली माणसं विचारवंतांच्याच शोधात असतात. शारिरीक सौंदर्य हे फक्त प्रारंभापुरतं निमित्तच ठरतं. प्रवासभर सोबत होते ती विचारांचीच..” पुस्तकात काय असतं? तुम्ही म्हणाल पुस्तकात कथा असतात. पण मी म्हणेन, पुस्तकात लेखक ते लिहिताना जगलेला असतो. त्यांनी मांडलेले विचार हे केवळ काल्पनिक नसतात तर काही त्यांनी घेतलेले अनुभव देखील असतात. आज व.पुं.नी समाजासाठी अनेक पुस्तकं, कादंबरी, त्यांनी केलेली कथाकथनं उपलब्ध केली आहेत. आपण जेव्हा त्यातले विचार वाचतो, तेव्हा ते आपल्या जगण्याला एक अर्थ देतात हे नक्की..
आज तुमच्याशी एक गोष्ट शेअर करते, माझ्या मनात नेहमी एक विचार येतो, लेखक म्हणजे कोण तर व.पु. म्हणतात तसं, ” ज्याला लेखणीतून संवाद साधता येतो त्याला मी लेखक समजतो..” बरोबर आहे. पण आपण पुस्तकं फक्त वाचतो, त्यात लिहिलेल्या विचारांवर आपण विचार करतो का? कारण, लिहिलेली कोणतीच ओळ ही अशीच नसते. त्यामागे काहीतरी भूमिका असते, काही अनुभव असतात. उदाहरणार्थ, व.पुं.नीच मांडलेला विचार, ” एकत्र राहायला अक्षता लागत नाही तर understanding लागतं..” फक्त दोन ओळीत संपूर्ण सहजीवनाचा अर्थ सांगणारा विचार आहे. कारण, तुम्ही लग्न थाटामाटात करा किंवा रजिस्टर पद्धतीने करा, तुमच्या दोघांत जर संवादाची भूक, ओढ आणि विश्वास नसेल तर त्या डोक्यावर पडलेल्या अक्षता या काही उपयोगाच्या नाही. जिथे पार्टनर कमी पडतोय असं वाटलं तर आपण उभं राहून त्याला आधार देणं हा त्या विचाराचा अर्थ असावा असे मला वाटते..
आज व.पुं.नी जे काही लिहिले आहे त्या विचारांच्या वाटेवरून जाताना समजतं की आयुष्य हे कसं जगायचं हे आपल्यावरच अवलंबून आहे. समजा, पायात जेव्हा काटा टोचतो तेव्हा तो आपण लगेच काढून टाकतो..का? कारण, तो काढल्या शिवाय आपण नीट चालू शकत नाही. थोडे रक्त येते, दुखते पण सहन करतो आपण. तसंच आयुष्यात येणाऱ्या माणसांचं असतं.
ज्यांच्या असण्यामुळे आपल्याला त्रास होतो, किंवा ज्या व्यक्ती आपल्याला फसवत आहेत अशांना वेळीच बाय बाय म्हणायचं, मन गुंतलं असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी वेळ लागतो पण चुकीच्या व्यक्तींना आयुष्यात कधीही जागा देऊ नये हेच आपल्याला व.पुं.चे विचार शिकवतात नाही का!! म्हणून, माणसाने अति नाही पण विचारी असावं परंतु अविचारी असू नये..
✍️ मानसी देशपांडे
विरार.
