पत्नीला पतीपासून काय पाहिजे असते ?

साधारण पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही……

आम्ही राहतो तेथे समोरच एक लोहार आपल्या पत्नी सोबत रहायला आला होता, म्हणजे त्याने तंबूसारखी झोपडी उभी केली होती. काही दिवसांनी माझ्या असे लक्षात आले की, त्या लोहाराच्या झोपडीसमोर तरूण मुलांची खुप गर्दी होत असते.

मी व्यवस्थित निरीक्षण केले तर मला असे दिसून आले की, ती मुले खुप श्रीमंत होती. त्यांच्या गळ्यात सोन्याच्या साखळ्या, बोटात सोन्याच्या अंगठ्या, गाड्या होत्या. मला वाटले की, ही मुले तिथे गप्पा मारायला थांबत असतील. मी दररोज निरीक्षण करत होतो.

एके दिवशी माझे लक्ष त्या लोहाराच्या पत्नीकडे गेले. ती खुपच अवर्णनीय अशी सुंदर होती. आता माझ्या लक्षात आले की, ही मुले येथे का थांबत आहेत ?

मी निरीक्षण केल्यावर असे दिसून आले की, ती लोहाराची पत्नी यांना काहीच रिपाॅन्स देत नव्हती. त्यांचे श्रीमंतीचे प्रदर्शन, सोन्याचे दागिने, गाड्या याकडे तिचे अजिबात लक्ष नव्हते. ती तिच्या कामात मग्न होती. तिचा नवरा व ती लोखंडाच्या वस्तू बनवायचे काम करत होते. जवळच तिचे छोटे बाळ होते. काम करता करता ती आपल्या बाळाकडे बघत हसत होती. नव-याबरोबर हास्य विनोद करत होती.

पण येवढे मात्र खरे की,

ती या मुलांना अजिबात कोणत्याही प्रकारे रिपाॅन्स देत नव्हती, त्यांच्याकडे ती बघतही नव्हती.

एक॔दरीत ती स्त्री येवढी सुंदर असूनही आपल्या संसारात, नवरा व मुलाबरोबर ती सुखी व समाधानी दिसत होती.

मी विचार करू लागलो की, या स्त्रीला तिच्या नव-याकडून असे काय व कोणते सुख मिळत असेल की, ज्यामुळे ती सुखी व समाधानी दिसत होती ?

तिचा नवरा तिला राहायला चांगले घर देऊ शकत नाही. सोन्याचे दागदागीने देऊ शकत नाही. चांगल्या हाॅटेलमध्ये नेऊन खायला घालू शकत नाही. तिला चित्रपट पाहायला किंवा फिरायला गाडीतून घेऊन जाऊ शकत नाही. घालायला चांगले फॅशनेबल कपडे नाहीत.

मी अशा अनेक स्त्रिया पाहिल्या आहेत की, ज्या नव-याजवळ हे पाहीजे, ते पाहीजे म्हणून रूसुन-फुगून बसतात. दुस-या बाईने एखादी वस्तू आणली की मला पण पाहीजे म्हणून वादविवाद करणा-या आणि त्यासाठी आपल्याच नव-याची इब्रत चारचौघांमध्ये काढणा-या बायका मी पाहील्या होत्या. एखादी गोष्ट पाहीजे म्हणजे पाहीजेच.

हे उत्तर वाचणा-या पुरूषांनी विचार करावा की, तुम्हाला चित्रपटातील हिरोईन ची फिगर आकर्षक दिसते म्हणून तुम्ही जर तिच्या बरोबर लग्न केले तर तिचे नटणे, आकर्षक दिसणे याचा खर्च तुमच्या पगारातून होईल काय ?

अशा किती स्त्रिया आहेत की, ज्या आपल्या पतीच्या पगारामध्ये किरकिर न करता संसार चालवतात ?

या लोहाराच्या ‘स्त्री’ला तिच्या नव-याकडून असे काय मिळते म्हणून ती येवढी सुखी व समाधानी दिसत होती…?

ती दिसायला येवढी सुंदर होती की, तिने एखाद्या पुरूषाकडे नुसते बघुन हसली आणि बोलली तरी तो पुरूष तिच्यासाठी वेडा होऊन तिला घर, गाडी, दागदागीने, हाॅटेल, फिरणे सर्व काही त्याने केले असते.

एक दिवस मला एक कोयता तयार करायचा होता म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. मी त्या लोहाराला तसे सांगितले आणि किती पैसे होतील हे विचारले.

लोहाराच्या पत्नीला मी म्हणालो की, ” ताई मला अशा पद्धतीने कोयता तयार करून पाहीजे आहे.” येवढा वेळ माझ्याकडे न बघणारी ती स्त्री माझे बोलणे ऐकून मला म्हणाली की, “एक तास लागेल दादा, बसा तुम्ही.”

ती आणि तिचा नवरा माझ्या बरोबर गप्पा मारायला लागले…

मी बोलता बोलता तिला म्हणालो की, “ताई इथे ही मुले दररोज का उभी रहातात ?”
ती म्हणाली की, ” दादा जसे तुम्ही दररोज तुमच्या घरातून आमच्याकडे बघता, तशीच ती मुले पण आमच्याकडे बघायला थांबतात…!”
मी दचकून तिच्याकडे पाहीले. तशी ती म्हणाली की, “दादा तुम्ही मला ताई म्हणाला… तुमची नजर वेगळी आहे आणि त्यांची नजर वेगळी आहे. आम्ही जिकडे जातो तिकडे असंच असतं. मी अशा लोकांना अजिबात प्रतिसाद देत नाही, कारण मला माझा नवरा आवडतो. मी माझ्या संसारात सुखी आहे. माझ्या नव-याला हे सर्व दिसते पण मीच त्याला सांगितले आहे की, तुम्ही अशा माणसांना काहीच बोलू नका.”

तिचा नवरा गुपचूप आपले काम करत होता. त्याचा बायकोवर पूर्ण विश्वास आहे असे दिसत होते.

नवरा- “कसे आहे दादा, लोकांना काय एखादी सुंदर मुलगी किंवा स्त्री दिसली की, तिच्यामागे लागायची, तिला पैसे, दागदागिने, यांचे आमीष दाखवायची सवय असते. काही मुली व स्त्रिया त्यांच्या जाळ्यात अडकतात. पण सर्वच जणी तशा नसतात…. जशी माझी बायको आहे. अनेकदा अशा पुरूषांना असे दिसून आले की, समोरची स्री आपल्याला काहीच प्रतिसाद देत नाही तर ते समजुन जातात की ती तशी नाही मग ते तिचा नाद सोडून देतात. पण जर एखाद्या स्री ने त्यांचा अपमान केला किंवा त्यांना काही रागाने बोलली तर मग ती सूडाने पेटतात.”

त्या दोघांचे काम सुरू होते. तो लोहार बोलत होता आणि मी ऐकत होतो.

“आम्ही जिकडे जाऊ तिकडे सगळीकडे हाच अनुभव. मग आम्ही त्यांच्याकडे लक्षच देत नाही.”
मी त्याला म्हणालो की, “एखाद्याने जर जबरदस्ती केली तर ?”
एवढ्या वेळ शांत असलेली त्याची बायको पटकन म्हणाली, “दादा माझा नवरा वाघ आहे वाघ.. हातात हातोडा घेऊन जो लोखंडाला वाकवू शकतो. त्याच्या ताकतीपुढे माणसाच काय घेऊन बसलात ?”

केवढा हा नव-यावर विश्वास ?

माझा कोयता तयार झाला होता. मी पैसे दिले आणि कोयता घेऊन घरी आलो. मी त्या लोहाराच्या भाग्याचा विचार करत होतो की, त्याची बायको दिसायला तर सुंदर होतीच पण वागायला पण खुपच सुंदर होती. तिचे शरीर व मन दोन्ही खुप सुंदर होते. आपला नवरा जसा आहे, तसाच स्वीकारून ती मनापासून सुखी व समाधानी होती.

जगात तिच्यासारखी लाखात एक तरी स्त्री असेल काय ?

संग्राम.
सामायिक सौजन्य.. सचिन व्यंकट वाळके. (मानसतज्ञ)
साभार… मानसरंग.
कथाविश्व – आपले सुंदर पान..🎉✨🎊

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.