भगवान लक्ष्मीकांत
श्रीमंत लखुजीराजे जाधवराव यांच्या राजधानी सिंदखेडराजा येथील समाधी स्थळाजवळ केलेल्या उत्खननात सापडलेली श्री पद्मनाभ शेषशायी भगवान लक्ष्मीकांत विष्णूची मूर्ती..
याहून सुंदर मुर्ती महाराष्ट्रभरात क्वचितच इतर कुठे पाहता येईल..

शेषनागाच्या वेटोळ्यावर श्रीहरी विष्णू पहुडलेले आहेत, फणिंद्राने आपल्या स्वामीवर छत्र धरलेले आहे. नारायणाने खालच्या उजव्या हातात कमळ धरले आहे व तो हात अलगद छातीवर आत्मस्थानावर ठेवला आहे. वरच्या हाताने डोक्यास आधार दिला आहे. त्याजवळच पात्रात पांचजन्य शंख ठेवलेला आहे. वरच्या डाव्या हातात सुदर्शन चक्र आयुध आहे तर खालच्या हातास कौमोदकी गदेने आधार दिला आहे. श्रीहरीचा भाव अत्यंत स्थिरचित्त दर्शवला आहे. डावा पाय तिढी टाकून एका आसनावर ठेवलेला आहे, तर उजवा पाय भृगुनंदिनी महालक्ष्मी जणू आपल्या हातात घेऊन विष्णूपदाची शुभलक्षणे न्याहाळत आहे. लक्षणे पाहतानाचा महालक्ष्मीचा अचंबित आणि कौतुकाने भरलेला भाव मुर्तीकाराने तिच्या चेहऱ्यावर अद्भुतपणे साकारला आहे. महालक्ष्मी ज्या आसनावर बसली आहे त्याखाली मांगल्यदायक नृत्य व वादन करण्यात अप्सरा दंग आहेत. वैकुंठस्वामिनी महालक्ष्मीच्या डोक्याजवळ एक सेविका कदाचित चवरी ढाळत आहे.
विष्णूसमोर दास्यत्वभावाने पक्षीराज गरुड करांगुळी जोडून उभा आहे. पद्मनाभाच्या बेंबीतून उत्फुललेल्या कमळावर ब्रह्मदेव विराजीत आहेत. त्यांच्या पाठीमागे समुद्रमंथन प्रसंग दाखवण्यात आला आहे. जणू जगताधार विष्णू शांतपणे मंदार पर्वताचाही आधार झाला आहे. वासूकीची दोरी करुन समुद्र घसळणे सुरु आहे. शेपटीकडे विविध देव आहेत याद गजाननाची गोंडस मुर्ती देखील दिसत आहे. तर नागफण्याच्या बाजूस एकटा दैत्य ओढत आहेत. समुद्रमंथनातून प्राप्त झालेले ऐरावत, उचैःश्रवा, कामधेनू असे चौदा रत्न देवांच्या बाजूस दाखविण्यात आले आहेत. तर शेषनागाच्या फण्याभोवती विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत.
सदर शिल्पातील प्रत्येकच मुर्ती बारकाईने उत्तमरित्या कोरलेली व विविध आभूषणांनी अलंकृत केलेली आहे. पद्मनाभ, पद्मपाणी, शेषशायी, लक्ष्मीकांत, नारायण अशा सर्वच वर्णनांना साजेशी ही नितांतसुंदर मूर्ती शिल्पकलेचे सर्वोत्तम उदाहरण म्हणून महाराष्ट्राचे नेतृत्व करेल.
लखुजीराजेंचा जाधवराव वंश देवगिरीच्या यादवांचा वारस आहे. हे तेच यादव आहेत जे स्वतःस अभिमानाने विष्णूवंशोद्भव (विष्णूचे/श्रीकृष्णाचे वंशज) म्हणवितात. त्याच लखुजीराजेंच्या समाधी परिसरात विष्णूचे सारासार चरित्र वर्णन करणारी ही मूर्ती सापडली हा एखादा काव्यगत दैवी योगायोग आहे.
✍️ स्वप्नील महेंद्र जाधवराव
