छळणारा प्रश्न
“प्रेम कर भिल्लासारखं बाणांवरती खोचलेलं
मातीमध्ये उगवूनसुद्धा मेघा पर्यंत पोचलेलं.”
अकरावीच्या क्लासवर कुसुमाग्रजांची ही कविता शिकवण्यात दिलीप तल्लीन झाला होता.
विद्यार्थ्यांशी एकरूप होऊन शिकवणं हे त्याच्या अध्यापनाचं खास वैशिष्ट्य.
भारती कॉलेजमध्ये मराठीचा प्राध्यापक म्हणून तो नुकताच रूजू झाला होता…
आणि अल्पावधीतच तो विद्यार्थ्यांचा आवडता बनला होता.
आजही तो त्याच्या लाडक्या विद्यार्थ्यांना कवितेचा अर्थ समजावून सांगत होता.
नुकतीचं मिसरूड फुटलेली पोरं आणि केसाच्या बटा गालावरून फिरवणाऱ्या पोरी मन लावून ऐकत होते.
त्यात प्रेम हा आवडीचा विषय.
भाषेचा तास अगदी रंगात आलेला असताना अचानक एक मुलगी उठली आणि म्हणाली,
“सर,तुम्ही कधी कुणावर प्रेम केलंय?
अचानक आलेल्या या प्रश्नानं सारी मुलं त्या मुलीकडे पाहू लागली.
हसू लागली.
एकमेकांत कुजबुज करू लागली.
दिलीप क्षणभरासाठी स्तब्ध झाला पण लगेचच भानावर येत तो म्हणाला,”प्रेम फुलांवर करावं,वेलींवर करावं,पशू-पक्ष्यांवर करावं,देशावर करावं..”
कितीतरी वेळ तो स्षटीकरण देत राहिला.
इतक्यात बेल वाजली आणि त्याचा तास संपला.
कॉलेज सुटल्यावर दिलीप घरी आला.
“आई,बाबा आले.”
असं म्हणत छोट्या समीरने त्याला मिठी मारली.
सुमती हॉलमध्ये आली.
आज तर समीर बाबांची आतुरतेने वाट पाहत होता.
त्याने बाबांच्या हातातली बॅग घेतली.
कपाटात ठेवली.
दिलीप हात पाय धुवून सोफ्यावर विसावला.
सुमतीने दिलीपसाठी पाणी आणलं.
चहा ठेवण्यासाठी ती आत गेली.
सोफ्याजवळ घुटमळत समीर म्हणाला,
“बाबा,मला ना नवं दप्तर आणायचंय,बॉटल आणि बॅग सुद्धा.
मार्केटमध्ये जाऊ आपण शाळा सुरू होतेय दोन तीन दिवसात.”
“आज नको,बघू उद्या परवा.
आज बरं वाटत नाही मला.
आराम करतो.”
“का हो काय दुखतंय?”
चहाचा कप दिलीपच्या हातात देत सुमतीने विचारले.”
“थोडसं डोकं दुखतंय.”
“बाम लावून देऊ?”
“नको.आरामच करतो थोडा.
बरं वाटेल.”
आईबाबांच्या हे संभाषण चालू असताना समीर रूसून रूममध्ये निघून गेला.
त्याची समजूत काढण्यासाठी सुमतीही पाठोपाठ रूममध्ये गेली.
दिलीपने चहा घेतला.
रिमोट हातात घेऊन तो टीव्हीचे चैनल बदलू लागला.
खरं तर कुठल्याही कार्यक्रमात त्याचं लक्ष लागत नव्हतं.
‘सर तुम्ही कुणावर प्रेम केलंय?’
असा प्रश्न विचारणारी ती मुलगी त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हती.
तिचा तो प्रश्न त्याला छळू लागला.
समीर रिमोट कन्ट्रोल कार खेळत हॉलभर फिरू लागला.
त्या गाडीचा आवाजही दिलीपला सहन होत नव्हता.इतक्यात सुमतीने आवाज दिला,
“अहो,ऐकलंत का स्वयंपाक झालाय .”
तिच्या आवाजाकडेही त्याचे मुळीच लक्ष नव्हते.
सुमतीनं आणखी एकदा आवाज देऊन पाहिला.
पण स्वारी ढिम्म.
मग तीच बाहेर आली आणि म्हणाली,
“येताय ना जेवायला?”
“वाढ ताट.आलोच.”
अनिच्छेनेच दिलीप उत्तरला.
जेवतानासुद्धा तो बळेबळेच घास आत ढकलू लागला.
पटापट जेवण उरकून तो पुन्हा सोफ्यावर जाऊन बसला.
आज दिलीप असा का वागतोय हा विचार करत करत सुमतीने जेवण आटोपले.
डायनिंग टेबल आवरून घेतला.
स्वयंपाक घराची आवराआवर करून ती ही थोडा वेळ टिव्ही पहावा म्हणून हॉलमध्ये आली.
दिलीपशी थोडं बोलावं असं तिच्या मनात होतं पण काही बोलण्याच्या आतच तो म्हणाला,
“सुमती,मला उद्याच्या लेक्चर ची तयारी करायची आहे.
आज मी बाजूच्या रूममध्ये जातोय.
उशीर झाला तर झोपेल तिथेच.”
“अस्वस्थ वाटतंय.
डोकं दुखतंय तर राहूद्या ना.
दोन दिवस सुट्टीच घ्या.”
“नाही,नको.”
असं जुजबी उत्तर देऊन तो रूममध्ये निघून गेला.
ही त्याची स्पेशल रूम.
‘लेक्चरची तयारी’ हा तर बहाणा होता.
खरं तर त्याला एकांत हवा होता.
काही लिहायचं,वाचायचं असलं,एकांत हवा असला की तो इथेच यायचा.
त्याला वाचनाचा छंद.
पुस्तक ठेवायला त्यानं मस्त कपाट बनवून घेतलं होतं.
त्यात पुस्तकांची सुंदरशी मांडणी करून ठेवली होती.
दिलीप थोडा वेळ कपाटाशेजारच्या खुर्चीवर डोळे लावून शांत बसला.
नंतर उठून त्यानं कपाटातून कोरे कागद काढले.
पेन घेतला आणि टेबलजवळ आला.
तो काहीतरी लिहीण्याचा प्रयत्न करू लागला.
“कविताच साऱ्या माझ्या
काळजात कोरलेल्या
तुझी चाहूल लागली
वेड्या पुन्हा बहरल्या..”
ही तर सखीची कविता..
आणि कितीतरी वेळ तिच्या कविता तो कागदावर उतरत राहिला.
तो क्षणभर खुर्चीला डोकं टेकवून बसला.
अधून मधून त्याला डोळा लागत होता.
तशातच त्याला समोर एक आकृती दिसली.
हा भास की सत्य त्याला समजत नव्हतं.
ही तर अकरावीची विद्यार्थिनी.
“सर,तुम्ही कुणावर प्रेम केलंय?”
असं विचारून शांत पाण्यात खडा टाकणारी हीच ती मुलगी.
आताही त्याच्या कानात तोच प्रश्न घुमत होता.
“हो हो हो मी प्रेम केलंय.
“दिलीप त्या आकृतीकडे पाहत म्हणाला.
” सांगा ना सर मग ती कोण?”
..आणि दिलीप बोलू लागला.
सुजाता.
पण माझ्यासाठी सखीच.
दोन जिल्ह्यातील दोन गावचे दोघे आम्ही.
विद्यापीठाच्या युवक महोत्सवात तिला मी पहिल्यांदा पाहिलं.
प्रचंड आत्मविश्वासानं भरलेली गोड मुलगी.
स्टेजवर बोलू लागली तर काळजाचा कान करून ऐकावं अशी बोलायची.
कथा असो वा कविता किंवा नाटिका ती सादर करावी फक्त सखीनंच.
तिच्या ओठात जणू मोगऱ्याच्या कळ्याच पेरल्या होत्या.
सखी म्हणजे सोनचाफा.
सखी म्हणजे पारिजात.
तिला पाहिलं की मी खुलायचो.
वयच होतं ते बहरायचं.
तिनं माझ्या काळजाची तार हळूवार छेडली.
कॉलेजमध्ये कितीतरी पोरींचा गराडा भवती असायचा पण सखीला पाहून जी प्रेमाची गोड संवेदना जागली तसं कुणाबद्दलच काही वाटलं नव्हतं.प्रेम..
प्रेम म्हणतात ते हेच तर नव्हे असं वाटू लागलं.
मी तिची ओळख वाढवण्यासाठी मुद्दाम तिच्या ग्रुपमध्ये सहभागी झालो.तिच्यासोबत नाटिकेत सहभागही घेतला.
तिचा सहवास मला आवडू लागला.
ती ही मला पाहून छानशी स्माईल द्यायची.
तिच्या मैत्रिणीही मी आलो की तिच्याकडे पाहून हसायच्या.
आणि एक दिवस जवळ कुणी नाही हे पाहून तिला विद्यापिठाबाहेरील बागेत भेटण्यास सांगितलं.
खरंच ती आली.
कुठलाही प्रश्न न विचारता कुण्या नवख्या पोराच्या एका शब्दाखातर ती आली.
“तू मला फार आवडतेस सखी.
माझं तुझ्यावर प्रेम आहे.
कायमची माझी होशील?”
मी डायरेक्टच सांगून दिलं.
ती क्षणासाठी थबकलीच.
जराशी लाजली.
पण मला तिचा होकार हवा होता.
एरवी स्टेजवर एवढ्या धिटाईनं बोलणारी सखी कितीतरी वेळ काहीच बोलली नाही.तिनं तिचा फोन नंबर दिला आणि कुणाच्यातरी फोनचा बहाणा करून ती परतली.
मी तिच्या उत्तराची वाट पाहत बराच वेळ तिथेच थांबलो.
महोत्सवाचे चार पाच दिवस सखीच्या सहवासात कापरासारखे भुर्रकन निघून गेले.
ती तिच्या गावी भिलेवाडीला निघून गेली.
मी ही मित्रांसोबत सातारला आलो.
घरी येऊन चार पाच तर दिवस झाले होते.
ते मला एका तपासारखे वाटू लागले.मला मुळीच करमत नव्हतं.
जीव बैचेन व्हायचा.
चोहिकडे सखीचा भास व्हायचा.
तिच्याशिवाय जगणं प्रेतवत वाटू लागलं.
तिचा फोन नंबर जवळ होता.
करू की नको या द्वंद्वात मी असताना एके दिवशी तिचाच फोन आला.
बोलणं कमी आणि फोनवरही शांतताच.
पण परीक्षा संपल्यावर पुढील महिण्यात ती मला भेटायला सातारला येणार हे सांगताच मी एकदम उडीच मारली.माझं प्रेम ती स्विकारेल की नाही हा प्रश्न होताच तरीही ती भेटणार या कल्पनेनेच मी मोहरून गेलो.
त्या दिवसाची वाट पाहू लागलो.
तो दिवस उजाडला.
सातारच्या माळाजवळ शंभूचं मंदिर होतं.
पलीकडे नदी.
तिथेच भेटायचं ठरलं होतं.
सखी माझ्या आनंदाची कुपी.
आज माझ्या जीवनात आनंद भरण्यासाठी ती येणार होती.
माझ्या मनात प्रेमाच्या लहरी तरंगू लागल्या.
मला तिची जन्मांतरीची साथ हवी होती.तिला हे सांगायचं होतं.
नियतीचा खेळ वेगळा होता.
नदीच्या काठावर मी वाट पाहत बसलो.
घड्याळाचा काटा पुढे सरकत होता.
अजून ती आली नव्हती.
तिचा फोन कितीतरी वेळा ट्राय केला तरी स्वीच ऑफ येत होता.
निराश मनाने घरी आलो.
अशी कुठली अडचण तिला आली असावी?
मग निदान फोन करून सांगावा तरी..
उगीच मनाशी बोलू लागलो.
वेडं मन तिच्या फोनकडे लक्ष लावून होतं.
येताना काही झालं तर..?
असे वाईट विचारही मनात चमकू लागले.तिची काळजी वाटू लागली.
दोन तीन दिवस उलटले.
जीव झुरणीला लागला होता.
माझं फोन लावणं चालूच होतं.
आणि एकदा तिच्या फोनची रिंग वाजली.
पलीकडून एक गृहस्थ म्हणाले,”हॅलो,कोण बोलतंय?
कोण हवंय तुम्हाला?
“सखी…
मनातच पुटपुटलो.
सुजाता नाईकचाच नंबर ना हा?”
“हो तिचाच.
ती काही कामासाठी सातारला जात असताना बसच्या अपघातात वारली.”
कातर स्वरात ते बोलले.
माझं काळीजच चिरणारी बातमी त्यांनी दिली.
तिकडून कितीतरी वेळ हॅलो,
हॅलो असा आवाज येत राहिला..
माझे कान बधीर झाले.सखी या जगात नाही?
माझं अवघं विश्वच उध्वस्त झालं होतं.जीवनाचं वाळवंट झालं होतं.जिच्यासोबत संसार फुलवण्याचं स्वप्न पाहू लागलो ती सखी मला एकट्याला टाकून दूर दूर निघून गेली होती.
जीवन चालू होतं पण जगणं विसरलं होतं.
दैनंदिन व्यवहार थोडेच चुकतात?
एके दिवशी रस्त्यात प्राजक्ता- सखीची जीवलग मैत्रीण भेटली.
नव्हे ती खास मलाच भेटायला आली होती.तिचे डोळे पाण्यानं डबडबले होते.ती म्हणाली,
“दिलीप,काय अवस्था करून घेतलीयस स्वत:ची?”
“आता चांगलं राहून तरी काय करू?
ज्याचा जीवच गेलाय त्या देहाचं कसलं जगणं?”
“सावर स्वत:ला.
ही घे सखीची डायरी.ही डायरी म्हणजे सखीचा प्राण.
ती वाच.तुझ्यासाठी काहीतरी लिहीलंय तिनं.”
डायरी देऊन प्राजक्ता निघून गेली.
सखीची डायरी…
पानापानावर माझं नाव अन् त्याखाली लिहीलेल्या कविता.
युवक महोत्सवापासून आमच्यात जे जे घडलं ते तिनं लिहीलं होतं.किती प्रेम करत वेडी माझ्यावर.
ते वाचून मी व्याकूळ होऊ लागलो.
कसली जादू होती तिच्या काव्यात.
अख्खं काळीजच गोंदून टाकलं होतं तिनं प्रत्येक शब्दातून.
काय सुंदर प्रतिमा,किती ओघवती शैली.
मी पुन्हा पुन्हा अधाशासारखं पान अन् पान वाचून काढलं शेवटच्या पानावर लिहीलं होतं..
“तुझ्या वरील प्रितीचा
पुरावा देऊ कशाला
विझल्यानंतर आत्मा निजतो
फक्त तुझ्या उशाला.”
या कविता जगल्या पाहिजेत.
दिगंतात सखीच्या शब्दांचा गंध दरवळायला हवा.
तिच्या कवितेचं मी पुस्तक करीन.
आता या ध्येयासाठीच माझं जगणं.
अचानक काहीतरी पडल्याचा आवाज आला तशी दिलीपला जाग आली.
समोर पाहिलं तर कुणीही नव्हतं.
मघापासून जे चालू होतं ते सत्य नसून स्वप्न होतं हे त्याला आत्ता समजलं.
कालपासून तो बैचेन होता.
आता त्याला हलकं हलकं वाटू लागलं.पहाटेची चाहूल लागली होती.
थोडावेळ अंथरुणात लोळत दिलीप रूममध्येच थांबला.
नंतर उठून हॉलमध्ये आला.
सुमती उठलेली पाहून तिला म्हणाला,
“सुमती,एक कप गरमागरम चहा..”
“अर्थातच,सरकार.”
“आणि हो आज लवकर घरी येईल.समीरला घेऊन मार्केटमध्ये जाऊ आपण.”
सुमती गोड हसली.
कालचं वादळ तिला शमलेलं दिसलं.
आवराआवर करून दिलीप कॉलेजमध्ये आला.
अकरावीच्या क्लासवर कालच्या कवितेचा राहिलेला भाग तो समजावून सांगू लागला.
सर्वांचं लक्ष सरांकडे पण त्याची नजर त्या पोरीला शोधू लागली.
आणि ती दिसताच त्यानं फळ्यावर मोठ्या अक्षरात हायलाईट केलं..
“प्रेम करावं तरच जगावं
नसता मातीत मरून जावं.”
कदाचित हेच तिच्या प्रश्नाचं उत्तर..
