वेळ मोजण्याची जुनी व खूप गंमतीदार साधने!!

वेळ मोजण्याची जुनी व खूप गंमतीदार साधने !
(मंगलाष्टके आठच का ?)

रोजचा सूर्योदय आणि सूर्यास्त यामुळे मानवाला आदी काळापासून दिवसरात्र या प्रकाराची प्रथम ओळख झाली असावी. त्यानंतर हळूहळू याचा तपशील शोधत शोधत खूप सूक्ष्म बारकाव्यांपर्यंत त्याला पोचता आले. भारतामध्ये वेद कालात सेकंदाच्या सर्वात सूक्ष्म भागाची मोजणी मोजली जाऊ शकत होती. मानवी हालचालींवर आणि निसर्ग चक्रावर ही गणना आधारलेली होती. डोळ्याची पापणी मिटून उघडणे, निरोगी माणसाने एकदा श्वास घेणे, एक चुटकी वाजविणे, एक स्वरोच्चार इतक्या सूक्ष्म कालावधीचा आपल्या कालमापन पद्धतीत विचार केलेला होता. डोळ्याची पापणी लवण्याच्या कृतीपासून क्षण, निमिष, लव, विपळे, पळे, कला, घटिका आणि मुहूर्त ही एकके क्रमाने मोजली जात असत. क्षणार्धात, निमिषार्धात, डोळ्याचे पाते लवते न लवते तोच, चुटकीसरशी, पळभर, लग्न घटिका, लग्न मुहूर्त हे सर्व शब्द साहित्यात अजरामर झाले. संत रामदास स्वामींनी ” घटका गेली पळे गेली तास वाजे झणाणा ” यात माणसाच्या व्यर्थ जाणाऱ्या आयुष्याचा हिशेब याच सर्व शब्दांचा वापर करून मांडला आहे .

प्राचीन काळात आपल्याकडे जसे सर्वात सूक्ष्म परिमाण दशलक्षांश सेकंदाचे एकक कल्पिलेले आहे तसेच काळाच्या अति प्रचंड ‘महाकल्प’ या एककाची केवळ कल्पना करणे देखील खूप महत्वाचे आहे. वैदिक ग्रंथांनुसार, विश्वाचा निर्माता ब्रह्मदेवाचे आयुष्य हे ब्रह्मदेवाची १०० वर्षे म्हणजेच १ महाकल्प इतके आहे. आता एक महाकल्प म्हणजे किती वर्षे हे वाचून आपण थक्क होतो. एक महाकल्प म्हणजे ३११,०४०,०००,०००,००० इतकी मानवी वर्षे ! काळाच्या अत्यंत सूक्ष्म परिमाणापासून ते इतकी मानवी वर्षे ही कल्पनासुद्धा थक्क करणारी आहे.

माणसाच्या प्राचीन जीवनाचा विचार केला तर, या गोष्टी खगोलीय गणित तज्ज्ञ, ज्योतिषी, धार्मिक शास्त्रे आणि विधी यांच्याशी संबंधित होत्या. नंतर हळूहळू सूर्योदयापासून किंवा पूर्ण चोवीस तासात आत्तापर्यंत किती काळ गेला याची नोंद घेणारी व्यवस्था निर्माण झाली. अडीच घटीका पूर्ण झाल्यावर कांशाच्या एका मोठ्या थाळ्यावर, सर्वाना ऐकू जावा म्हणून मोठ्याने एक टोला वाजविला जात असे. या कांशाच्या थाळ्याला तास म्हटले जाते. आजही हा तास आपल्याला गणपतीच्या आरतीमध्ये, मिरवणुकांमध्ये पाहायला मिळतो. कांही ठिकाणी तास ऐवजी घंटा वाजविली जात असे. घटिका, तास, घंटा, वाजविणे या शब्दांवरून ‘किती वाजले’, १ तास – २ तास, १ घंटा – २ घंटा, घडी – घड्याळ असे शब्द रूढ झाले. हा तास / काळ मोजण्यासाठी जगभर अनेक वस्तू वापरून अनेक प्रयोग केले गेले.

त्यातील अत्यंत अभिनव आणि गंमतीदार अशा कांही वस्तूंची आपण माहिती घेऊ या. सोबतचे महत्वाचे फोटो जरूर पाहावेत .

घटिका पात्र व मंगलाष्टके आठच का ? —

पाणी भरलेल्या घंगाळ्यासारख्या एका मोठ्या भांड्यात, तळाशी छिद्र असलेले एक वाडग्याच्या आकाराचे रिकामे भांडे ठेवले जात असे. यातील छिद्रातून पाणी आत येण्यास सुरुवात होऊन ते भांडे विशिष्ट वेळात बुडत असे. या भांड्यालाच घटिका ( पात्र ) म्हणत असत. सूर्योदयापासून हे पात्र भरणे आणि ते रिकामे करून भरण्यासाठी पुन्हा ठेवणे ही क्रिया काळजीपूर्वक करण्यासाठी एक प्रहरी नेमला जात असे. हे पात्र एकदा भरले म्हणजे १ घटिका म्हणजेच २४ मिनिटे होत असत. ( कांही ठिकाणी हे पात्र २० मिनिटात भरणारे असे ). अडीच घटिका म्हणजे एक तास पूर्ण झाल्यावर हा प्रहरी तेथे ठेवलेल्या कांशाच्या एका मोठ्या थाळ्यावर, एक ठोका देत असे. म्हणून ‘ तास झाला ‘ असे म्हटले जात असे. हे घटिकापात्र फारच प्रसिद्ध आहे. पूर्वी लग्नाच्या मुहूर्ताच्या आधी हे घटिकापात्र पाण्यात ठेऊन त्यावर लक्ष ठेवले जात असे. आपल्याकडे लग्नात मंगलाष्टके म्हणायची पद्धत आहे. ही अष्टकेच का ? यातील प्रत्येक मंत्र हा साधारणतः ३ मिनिटांचा असे व ८ मंत्र म्हणजे बरोबर २४ मिनिटात घटिका पात्र भरत असे. यावर लक्ष ठेवणारी व्यक्ती मुख्य भटजींना,’ घटका भरली ‘ असे लगेच सांगत असे. कांही जुन्या चित्रपटातील लग्नविधीच्या दृष्यात हे सर्व पाहायला मिळते. एखाद्याच्या मृत्यूच्या वेळीही अशा तऱ्हेने घटिका मोजल्या जात असत. त्यालाही घटका भरत आली, शेवटच्या घटका मोजतोय असे म्हणत असत.

वेळ मोजणारा अजब दुर्मीळ दिवा —

किती काल गेला, किती तास झाले हे सांगणारा हा दिवा खूप सुटसुटीत आणि सोयीस्कर पडत असे. समईसारख्या स्टॅण्डवर असलेल्या या दिव्यावर तेलासाठी एक पारदर्शक बाटली आणि त्यावरील धातूच्या पट्टीवर तास दर्शक अंक कोरलेले असत. यामध्ये तेल भरून हा दिवा लावला ( वात पेटविली ) की हळूहळू बाटलीतील तेलाची पातळी खाली खाली येऊ लागत असे. ही पातळी जेथे असेल तेथे नोंदविलेला अंक आपल्याला त्यावेळी किती वाजले हे सांगत असे. यातील कांचेच्या बाटलीची लांबी रुंदी, तेलाचा प्रकार, पृष्ठीय ताण ( सरफेस टेन्शन ) आणि ज्वलनाला लागणारा वेळ लक्षात घेऊन यावरील अंकपट्टी प्रमाणित केली जात असे.

मेणबत्तीचे घड्याळ आणि त्यावर गजराची व्यवस्था —

पूर्वी सर्रास वापरात असलेल्या मेणबत्तीचेच गजराचे घड्याळ बनविले जात असे. विशिष्ट लांबी रुंदीची मेणबत्ती पूर्ण जळण्यास किती वेळ लागतो हे पाहून त्यावर एक एक तासाच्या खुणा केल्या जात असत. मेणबत्ती ज्या खुणेपर्यंत जळली असेल तेवढे वाजल्याचे लगेच कळत असे. सर्वात गंमतीचा भाग म्हणजे यावर केलेली गजराची सोय ! जर ६ तास झालेले कळायला हवे असेल तर ६ तासानंतरच्या खुणेवर धातूचे खिळे अथवा धातूच्या छोट्या गोळ्या टोचून बसविल्या जात असत. तेथपर्यंत मेणबत्ती जळली की ते खिळे किंवा गोळ्या मेणबत्तीतून सुटून खाली ठेवलेल्या धातूच्या थाळ्यात पडत. त्याचा पडतांना येणारा आवाज हाच गजर म्हणून ६ तास झाल्याचा संदेश देत असे. पण यासाठी शांतता असणे मात्र आवश्यक असे. एरवीही ही मेणबत्ती, मध्येच केव्हातरी विझू नये याची काळजी घ्यावी लागत असे.

जळणाऱ्या दोरीचे घड्याळ —

पूर्वी सूर्यप्रकाशावर आधारलेली अनेक कालमापक घड्याळे रात्री उपयुक्त ठरत नसत. त्यावेळी ही अभिनव पद्धत वापरली जात असे. विशिष्ट प्रकारची पेटती दोरी रात्री कालमापनासाठी उपयोगी ठरत असे. या दोरीची जाडी व लांबी, ती कशापासून बनवायची ( सुंभ, ताग, अंबाडी, वाख इत्यादी ) याचे प्रयोग केले गेले. विशिष्ट प्रकारची, लांबीची, जाडीची दोरी एक तासात किती इंच जळते हे पाहून त्यावर तासाच्या खुणा केल्या जात असत. टांगून ठेवलेल्या या दोरीचे खालचे टोक पेटत ठेवले की जळून गेलेल्या आणि शिल्लक राहिलेल्या दोरीवरून वेळ मोजता येत असे. दोरीऐवजी विशिष्ट लाकडाची छडी किंवा काठी देखिल वापरली जात असे.

पाणीचोर ( क्लेप्सीड्रा ) घड्याळे —

एखाद्या भांड्याच्या छिद्रातून पाणी बाहेर पडण्याच्या प्रवाहावरून वेळ मोजण्याचे हे घड्याळ सुमारे ३५०० वर्षांपूर्वी अस्तित्वात होते. ग्रीक भाषेत क्लेप्सीड्रा म्हणजे पाणी चोर ! एका शंकूच्या आकाराच्या भांड्यात भरलेले पाणी, त्याच्या तळाशी असलेल्या बारीक छिद्रातून बाहेर पडत असे. त्याबरोबर पाण्याची पातळी खाली खाली जात असे. या शंकूवर प्रमाणित असे वरपासून खालपर्यंत तासाचे अंक लिहिलेले असत. पाण्याची पातळी ज्यावेळी जेथे असेल त्यावेळी तितके वाजले असे समजले जात असे. या शंकूतून पाणी हळूहळू चोरल्यासारखे निघून जाते म्हणून याला क्लेप्सीड्रा म्हणजे पाणी चोर म्हटले जात असे. तसेच याच्या उलट प्रकारात पाणी आत येणाऱ्या भांड्यांची घड्याळेही अस्तित्वात होती.

सुगंधी घड्याळे —

चीनमध्ये ६ व्या शतकामध्ये वेळ मोजण्यासाठी सरळ, दोरीसारख्या, सर्पाकार अशा विविध प्रकारच्या उदबत्त्या वापरात होत्या. धूप हा ज्योत धारण न करता संथपणे जळतो. त्यामुळे आग लागणे किंवा उदबत्ती विझणे या दोन्हीही शक्यता खूप कमी होतात. किती तास जळण्यासाठी किती धूप लागतो, तो किती लांबीच्या खाचेत भरावा लागतो किंवा किती जाडी व लांबीची उदबत्ती बनवावी लागते याचा सतत अभ्यास केला गेला. मजेदार गोष्ट म्हणजे एक तास संपून दुसरा तास सुरु झाला हे सहज कळण्यासाठी वेगवेगळे सुगंध वापरले जात असत. येणारा सुगंध बदलला म्हणजे पुढचा तास सुरु झाला हे लांबूनही लक्षात येत असे.

वेळ कळण्यासाठी सूर्य सावलीचे घड्याळ, वाळूचे घड्याळ अशी कितीतरी साधने जगभरात वापरली जात असत. आता अब्जावधी मोबाईल फोनमध्ये सहजपणे वेळ कळत असूनही घड्याळाचा प्रवास सुरूच आहे.

एच.जी. वेल्स यांनी १८९५ मध्ये ‘ द टाईम मशीन ‘ची कल्पना केली होती. यातून तुम्हाला भूतकाळात फिरून येण्याची कल्पना मांडली होती. प्रत्यक्षात ते जरी शक्य नसले तरी जुन्या काळाची नोंद करणाऱ्या या विविध “टाईम मशिन्सचा ” असाही मागोवा घेता येतो.

महत्वाची सूचना… सोबत माझ्याकडील या साधनांचे विविध फोटो ! असे दुर्मीळ फोटो पाहण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. म्हणून कृपया आपण हा लेख फॉरवर्ड केल्यास यातील फोटोही जरूर फॉरवर्ड करावेत. फोटो व्हॉट्स ॲपवर पाठविताना प्रथम आपल्या फोनवर डाऊनलोड किंवा सेव्ह केल्याशिवाय फॉरवर्ड होत नाहीत.

( संपादित.. पूर्वप्रसिद्धी किस्त्रीम दिवाळी अंक २०२३)

मकरंद करंदीकर.
makarandsk@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.